शेवटच्या डीसी लोकलची दुरवस्था
By Admin | Updated: April 30, 2016 02:10 IST2016-04-30T02:10:38+5:302016-04-30T02:10:38+5:30
हार्बरवरील डीसी परावर्तनावरील शेवटच्या लोकलला मध्य रेल्वे प्रशासन व प्रवाशांकडून मोठ्या थाटामाटात निरोप देण्यात आला.

शेवटच्या डीसी लोकलची दुरवस्था
मुंबई : हार्बरवरील डीसी परावर्तनावरील शेवटच्या लोकलला मध्य रेल्वे प्रशासन व प्रवाशांकडून मोठ्या थाटामाटात निरोप देण्यात आला. ही लोकल राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आल्यानंतर त्यावर हालचाली मात्र झाल्या नाहीत. सध्या कुर्ला स्थानकाजवळ धूळ खात पडलेली ही लोकल गर्दुल्ल्यांचा आसरा बनली असून अनेक गैरप्रकार त्यात होत आहेत.
या शेवटच्या लोकलचे डबे ठाणे, वाडीबंदर, पी. डीमेलो मार्ग आणि दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय येथे स्मारक म्हणून ठेवण्याचा निर्णयही मध्य रेल्वेकडून घेण्यात आला. मात्र या निर्णयानंतर रेल्वेकडून काहीच हालचाली झाल्या नाहीत. या लोकलच्या डब्यात ठिकठिकाणी बीअरच्या बाटल्या, काडेपेटीच्या डब्या, विडी-सिगारेटबरोबरच काही ठिकाणी मलमूत्र पडल्याचे दिसते. लोकलच्या डब्यात प्रचंड प्रमाणात दुर्गंधीही पसरलेली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांना विचारले असता, या लोकलचे तीन डबे दिल्लीच्या राष्ट्रीय रेल्वे वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. मात्र त्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणार आहे. त्यामुळे हे डबे आणखी काही वर्षे जपून ठेवावे लागतील, अशी माहिती सूद यांनी दिली. जर काही गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आल्यास ती ताबडतोब हलविण्याची प्रक्रिया केली जाईल, असे ते म्हणाले.