लास्ट बेंचर टू चीफ मिनिस्टर

By Admin | Updated: October 31, 2014 00:47 IST2014-10-31T00:47:14+5:302014-10-31T00:47:14+5:30

पायात साधी स्लीपर, खांद्यावर शबनम बॅग, कुरळे केस, अत्यंत शांत, लाजाळू, कधी कधीच बोलणारा आणि नेहमीच शेवटच्या बाकावर बसणारा शंकरनगरातील सरस्वती शाळेतला देवेंद्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे.

Last Bennure to Chief Minister | लास्ट बेंचर टू चीफ मिनिस्टर

लास्ट बेंचर टू चीफ मिनिस्टर

सरस्वती विद्यालयातून घडले देवेंद्र फडणवीस
नागपूर : पायात साधी स्लीपर, खांद्यावर शबनम बॅग, कुरळे केस, अत्यंत शांत, लाजाळू, कधी कधीच बोलणारा आणि नेहमीच शेवटच्या बाकावर बसणारा शंकरनगरातील सरस्वती शाळेतला देवेंद्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे. त्याची लास्ट बेंचर ते चीफ मिनिस्टर ही गरुडझेप शाळेच्या शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे, तर वर्गमित्रांसाठी गौरवास्पद.
सरस्वती विद्यालयात १९७४ ते १९८४ असे १० वर्षे देवेंद्र फडणवीसांनी शिक्षण घेतले. शांत आणि लाजाळू असला तरी, त्यांना वर्ग शिक्षक शेवटून दुसऱ्या बेंचवरच बसवायचे. याचा अर्थ ते अभ्यासात ‘ढ’ होते म्हणून त्यांना मागच्या बाकावर बसावे लागत नव्हते. तर देवेंद्रची उंची वर्गात सर्वात जास्त होती. मागच्या बाकावर बसत महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या सीएमने वेगवेगळे विषय आत्मसात केले.
शाळेत अत्यंत शांत, लाजाळू आणि कधी कधीच बोलणारे देवेंद्र सर्वांपासून वेगळे वाटायचे. म्हणून आजही ३० वर्षानंतर त्यांच्या वर्ग शिक्षिका सावित्री सुब्रमनियम यांना ते आठवतात. त्यांना देवेंद्रच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती. जे विचारले तेवढेच बोलणे, कधीच अनुशासन न मोडणे हे लहान देवेंद्रचे तेव्हाचे खास वैशिष्ट्य. अभ्यासात खूप पुढे नव्हते, तरी नेहमीच मेहनतीने देवेंद्र फडणवीस यांनी समाधानकारक गुण मिळविले. लाजाळू असूनसुद्धा देवेंद्र नेहमीच मित्रांसोबत वर्गातील सर्व कार्यांमध्ये सहभागी व्हायचे. मित्रांना साथ देणे, काहीही झाले तरी त्यांची साथ न सोडणे, असे अनेक गुण त्यांच्यात होते.
विशेष म्हणजे जेव्हा देवेंद्र आपले शालेय शिक्षण घेत होते, त्याच काळी त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस नागपुरातून विधान परिषदेचे आमदार होते. मात्र, देवेंद्रने कधीही आमदाराचा मुलगा असा बडेजाव केला नाही. पायी शाळेत येणे, पायात साधी स्लीपर, खांद्यावर शबनम बॅग, कुरळे केस, असाच त्यांचा पेहराव होता. देवेंद्र आमदाराचे पुत्र आहेत हे त्यांच्या बऱ्याच मित्रांना अनेक वर्षांपर्यंत माहीत नव्हते. (प्रतिनिधी)
बालपणापासून संघटनकौशल्य गुण
शाळेत खेळताना एकदा शिक्षिकेला चुकून चेंडू लागल्यामुळे देवेंद्रसह संपूर्ण वर्गाने उन्हात वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा भोगली होती. मात्र, एकाही विद्यार्थ्याने चेंडू नेमका कोणी मारला, हे मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितले नव्हते. लहानपणापासून देवेंद्र एकी घडवून आणण्यात तेव्हाही पटाईत होते. त्यांचे संघटन कौशल्य मित्रांना पावलोपावली जाणवायचे.
आजही शाळेशी संबंध
शाळेतून बाहेर पडल्यानंतरही देवेंद्र यांचा शाळेशी संबंध कायम आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या समारंभात ते शाळेत येतात, शाळेला मदतही करतात, खास बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी त्यांच्या १० वीच्या तुकडीला पास होऊन २५ वर्षे झाले. तेव्हा सर्व जुने वर्गमित्र वर्गात आले असताना, देवेंद्र फडणवीसने आपला शेवटचाच बेंच धरला होता. आपल्या या गुणवंत विद्यार्थ्याप्रती संपूर्ण शाळेला अभिमान आहे.

Web Title: Last Bennure to Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.