नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथील मोडेप्रो या रासायनिक कारखान्यात भीषण आग लागून तब्बल आठपेक्षा अधिक स्फोट झाले. स्फोटाने सुमारे पाच कि.मी.पर्यंतच्या परिसराला हादरा बसला. आगीचे कारण समजलेले नाही. कामगारांनी वेळीच पळ काढल्याने जीवितहानी टळली.मोडेप्रो कारखान्यात रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आग लागली. कारखान्यात औषधांचे उत्पादन केले जाते. कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती भडकत गेली. त्यामुळे कामगार कारखान्याच्या बाहेर गेले. त्याचवेळी रसायनाच्या साठ्याचा मोठा स्फोट झाला. त्यानंतर तासाभरात आठहून अधिक छोटे-मोठे स्फोट होऊन आग भडकली. हादºयांमुळे एक किमी परिसरातील कारखान्यांच्या, इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटून, पत्रे उडून पडले.संपूर्ण कारखान्यातून धुराचे लोळ निघू लागले. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील सर्व कारखाने बंद करून परिसर मोकळा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह महापालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. आग विझवण्याचे काम सुरू असतानाच संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मोठा स्फोट झाला.स्फोटाने कारखान्याच्या दोन मजली इमारतीचे छत उडून बांधकामाचा मोठा भाग कोसळला. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.
तुर्भेतील कारखान्यात भीषण स्फोट , आगीचा वेढा; आवाजाने पाच किलोमीटरचा परिसर हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 03:04 IST