मोठा व्याप; डोक्याला ताप!

By Admin | Updated: July 11, 2014 01:20 IST2014-07-11T01:20:46+5:302014-07-11T01:20:46+5:30

सक्करदरा, अजनी, कुही आणि हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील काही भागांना एकत्र करून हुडकेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आहे आणि या ठाण्याला सर्वाधिक क्षेत्रफळ असल्याचा मान मिळाला.

Large coverage; Head to the heat! | मोठा व्याप; डोक्याला ताप!

मोठा व्याप; डोक्याला ताप!

वर्चस्वासाठी गँगवॉर : जमिनीचे वाद, प्रॉपर्टीच्या फसवणुकीचे गुन्हे अधिक
मंगेश व्यवहारे - नागपूर
सक्करदरा, अजनी, कुही आणि हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील काही भागांना एकत्र करून हुडकेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आहे आणि या ठाण्याला सर्वाधिक क्षेत्रफळ असल्याचा मान मिळाला. पोलीस ठाण्याच्या भव्य व्याप सांभाळताना, ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताप वाढला आहे.
हुडकेश्वरचा पोलीस ठाणे शहराच्या सीमेजवळ आहे. पूर्वी हा भाग शहरातील सक्करदरा व अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यायचा. कालांतराने वस्त्या वाढल्या, लोकसंख्या वाढली, गुन्हेगारी वाढली. त्यामुळे लोकांच्या सोईसाठी २००९ मध्ये पोलीस खात्याने हुडकेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती केली. मात्र यात शहरातील पोलीस ठाण्याबरोबरच ग्रामीण ठाण्यातील काही भागही जोडला. त्यामुळे या पोलीस ठाण्याची व्याप्ती ८६ चौरस किलोमीटर एवढी वाढली आहे. या ठाण्याच्या अर्धेही क्षेत्रफळ कुठल्याच पोलीस ठाण्याचे नाही.
गुन्ह्यांचे प्रकार
मिहान प्रकल्पामुळे नागपूर शहराचा विकास साधारणत: दक्षिण भागाकडे मोठ्या प्रमाणात होत आहे. हुडकेश्वर पोलीस ठाणेसुद्धा शहराच्या दक्षिण भागात येते. येथे शेतीच्या जमिनीवर ले-आऊट पाडून प्लॉट विक्री जोरात सुरू आहे. नव्या वसाहतीचा विस्तार होत असल्याने, तुरळक घरे येथे आहेत. त्यामुळे घरफोडीचे प्रकार येथे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जमिनीचे वाद, प्रॉपर्टीच्या फसवणुकीचे गुन्हे येथे बऱ्याच प्रमाणात घडत असतात. ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असल्याने, खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या परिसरात फेकण्यात येते.
वर्चस्वासाठी गँगवॉर
हुडकेश्वर रोडचा दादा कोण यावरून नेहमीच शंकर गजभिये व येल्या मेश्राम या टोळींच्या चकमकी उडतात. येल्याने गजभियेवर देशीकट्ट्यातून गोळ्यासुद्धा झाडल्या होत्या. मात्र गजभिये त्यातून बचावला होता. त्याच्याकडून चार देशीकट्टेही जप्त करण्यात आले होते. क्षुल्लक कारणावरूनही भोसकाभोसकीचे प्रकार ठाण्याच्या हद्दीत घडले आहे. दिघोरी बहाद्दुरा परिसरात संजय अवतारे याची टोळी सक्रिय असून, त्याने आकाश पंचभाई या ग्रामपंचायत सदस्याचा खून केला होता. संजय अवतारे सध्या कारागृहात आहे.
पुतळे व धार्मिक स्थळे
या ठाण्याच्या क्षेत्रात धार्मिक स्थळे आणि पुतळे बऱ्याच प्रमाणात आहे. ठाण्याच्या हद्दीत प्रसिद्ध स्वामी समर्थांचे मंदिर, साईमंदिर अयोध्यानगर, बालाजी मंदिर, अय्यप्पा मंदिर असे पाच मंदिर आहेत. दोन चर्च व चार मस्जिदी आहेत. चार पुतळे आणि १५ शिक्षण संस्था आहेत.
गुन्ह्यांचा आलेख
या ठाण्यात घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असल्याने जुगार आणि अवैध दारूचे अड्डे असल्याने बेकायदेशीर दारू विक्रीचे, हाणामाऱ्याचे गुन्हे घडतात. ठाण्याचा गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता, २०११ मध्ये १९६, २०१२ मध्ये ३०४ आणि २०१३ मध्ये ३९४ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत १७२ गुन्हे घडले आहेत.
पेट्रोलिंगवर अधिक भर
चार महिन्यांपूर्वीपासून ठाण्याचा कारभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे बघत आहे. ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घरफोडीच्या घटला लक्षात घेता, पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात आला आहे. सध्या ठाण्याच्या हद्दीत दोन चौकी असून, प्रत्येक बीटमध्ये एक चौकी वाढविण्याचा प्रयत्न आहे.
ठाण्याचे क्षेत्रफळ ८६ चौरस किलोमीटर
हुडकेश्वर पोलीस ठाण्याची सीमा ही हिंगणा नाका, बेलतरोडी रोड, आऊटर रिंग रोड, हुडकेश्वर गाव, कुही फाटा, उमरेड रोड, दिघोरी, तुकडोजी चौक, मानेवाडा सिमेंट रोड अशी ८६ किलोमीटरची आहे. अंदाजे लोकसंख्या तीन लाख आहे. पोलीस ठाण्याचे पाच बीट आहेत. विहीरगाव बीटमध्ये प्रगती कॉलनी, नरसाळा, टेलिफोननगर, सर्वश्रीनगर येतात. हुडकेश्वर बीटमध्ये म्हाळगीनगर, हुडकेश्वर परिसर, नीळकंठनगर, नेहरुनगर येतात. अवधूतनगर बीटमध्ये विठ्ठलनगर, संजय गांधीनगर, भोलेबाबानगर, मानेवाडा वस्ती येते. बेसा बीटमध्ये बेसागाव, बेलतरोडी, घोगली व शंकरपूर येते. अयोध्यानगर बीटमध्ये महालक्ष्मीनगर, लाडेकर लेआऊट, उदयनगर, मानेवाड सिमेंट रोडचा पूर्व भाग येतो.
मनुष्यबळाचा अभाव
पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता या ठाण्याला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आहे. सध्या ठाण्यात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक दुय्यम पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, सात पोलीस उपनिरीक्षक, तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक, २१ महिला पोलीस कर्मचारी, ९९ पोलीस कॉन्स्टेबल असा एकूण १३५ पोलीसांचा स्टाफ आहे. विशेष म्हणजे या ठाण्याच्या पेट्रोलिंग करताना पथकाला जवळपास चार तास लागतात. १५ गावांचा या ठाण्यात समावेश आहे. गावातील रस्ते आणि पेट्रोलिंगचे क्षेत्रामुळे पोलीस ठाण्याची वाहने भंगार झाली आहेत.

Web Title: Large coverage; Head to the heat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.