लॅपटॉप चोर रिक्षाचालकाला अटक
By Admin | Updated: March 2, 2017 02:11 IST2017-03-02T02:11:45+5:302017-03-02T02:11:45+5:30
एका १७ वर्षीय मुलाचा लॅपटॉप चोरणाऱ्या रिक्षाचालकाला दहिसर पोलिसांनी शनिवारी अटक केली.

लॅपटॉप चोर रिक्षाचालकाला अटक
मुंबई : एका १७ वर्षीय मुलाचा लॅपटॉप चोरणाऱ्या रिक्षाचालकाला दहिसर पोलिसांनी शनिवारी अटक केली. मुख्य म्हणजे कोणताही क्लू नसताना रिक्षामागे लिहिलेल्या ‘समीर’ या नावाचा शोध घेत पोलिसांनी हे यश मिळवले आणि चोरीला गेलेला लॅपटॉपदेखील परत मिळवला.
अजय शुक्ला (४५) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. अजय नालासोपारा येथील राहणारा आहे. दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंशू व्यंकटेशन (१७) हा विद्यार्थी इयत्ता अकरावीत कांदिवलीच्या कॉलेजमध्ये शिकतो. १४ फेब्रुवारी रोजी त्याची बस सुटल्याने वांद्रे येथील घरी जाण्यासाठी त्याने ठाकूर मॉलच्या गेटवरून रिक्षा पकडली. तहान लागल्याने रिक्षा मध्येच थांबवून तो एका दुकानात पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेला. त्या वेळी त्याच्याकडचा लॅपटॉप त्याने रिक्षातच ठेवला. तो रिक्षातून उतरताक्षणीच शुक्ला रिक्षा घेऊन पसार झाला. हा प्रकार दहिसर पोलिसांच्या हद्दीत घडला. त्यानुसार अंशूने दहिसर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार हे तपास करीत होते. अंशूने रिक्षाचा नंबर लक्षात नसल्याचे सांगितले तरी रिक्षाच्या मागे समीर लिहिले होते, अशी माहिती त्याने दिली. त्यानुसार पवार यांच्या पथकाने अनेक रिक्षा पार्किंग पिंजून काढत ‘समीर’ नाव लिहिलेल्या चार ते पाच रिक्षाचालकांना ताब्यात घेतले. ज्यात शुक्लाचाही समावेश होता. त्यास अंशूने ओळखले. शुक्लाने गुन्हा कबूल करत नालासोपाऱ्याच्या घरात ठेवलेला सुमारे ९० हजारांचा लॅपटॉप परत आणून दिला. शुक्लाला पोलिसांनी अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)