देवनारमध्ये पालिका भुखंडावर भूमाफियांचा कब्जा

By Admin | Updated: June 4, 2014 22:58 IST2014-06-04T22:11:37+5:302014-06-04T22:58:24+5:30

मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाशेजारील मोकळा भूखंड भूमाफीयांनी कब्जात घेतला आहे.

Landowner's possession in municipality of Devnar | देवनारमध्ये पालिका भुखंडावर भूमाफियांचा कब्जा

देवनारमध्ये पालिका भुखंडावर भूमाफियांचा कब्जा

समीर कर्णुक। दि. ०४ (वार्ताहर)
मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाशेजारील मोकळा भूखंड भूमाफीयांनी कब्जात घेतला आहे. विशेष म्हणजे हा भूखंड पालिकेच्याच मालकीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे अनधिकृतपणे रेतीविक्रीचा व्यवसाय होता. सध्या येथे शेट उभारून ट्रक - टँकरचे मोठे गॅरेज सुरू करण्यात आले आहे. मात्र शेजारच्याच इमारतीत बसणारे पालिका अधिकारी याकडे काणाडोळ करत आहेत.
२२ हजार चौरस फुटांचा ५२ नंबर प्लॉट देवनार पोलीस ठाण्यापासूनही जवळ आहे. हा भुखंड पालिकेचा असूनही बेवारस अवस्थेत आहे. ना इथे पालिकेची मालकी सांगणारा बोर्ड आहे ना संरक्षक भींत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत सातेक वर्षांपासून अवैधपणे रेती विक्री करणार्‍यांनी तो कब्जात घेतला होता. मात्र काही दिवसांपासून इथली रेती विक्री बंद झाली आणि तिथे टँकर-ट्रक पार्क होऊ लागले. आता तर तिथे शेड उभारून त्याखाली गॅरेज सुरू करण्यात आले आहे. तसेच या शेडमध्ये वीजजोडणीही घेण्यात आली आहे.
पालिका कार्यालय, पोलीस ठाणे जवळ असूनही या भूमाफीयांवर कारवाई का होत नाही, असा सवाल इथले स्थानिक रहिवासी करतात. पालिका किंवा अन्य शासकीय यंत्रणांच्या भुखंडांवर सुरूवातीला अशाचप्रकारे अतिक्रमण केले जाते. पुढे वीज, पाणी जोडणी घेतली जाते. लाच देऊन त्या पत्त्यावरील फोटोपास, रेशन कार्ड, आधार कार्ड मिळवून मालकी हक्क प्रस्थापित केला जातो. कालांतराने जेव्हा या भुखंडांवर विकासकाम सुरू होते तेव्हा तेथील अतिक्रमित झोपडपटटया किंवा व्यावसायिकांचे प्रकल्पबाधीत ठरवून अन्यत्र पुनर्वसन करण्याची पाळी शासनावर येते, याकडेही स्थानिक रहिवासी लक्ष वेधतात.
दरम्यान, पालिकेच्या एम पुर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना विचारले असता त्यांनी प्लॉट नंबर ५२वरील अतिक्रमणाबाबत आपल्यापर्यंत माहिती आलेली नाही. मात्र माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.
 

Web Title: Landowner's possession in municipality of Devnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.