सहा महिन्यांत भूसंपादनाचे सर्वेक्षण

By Admin | Updated: November 7, 2014 23:32 IST2014-11-07T23:10:49+5:302014-11-07T23:32:29+5:30

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : विनायक राऊत, राधाकृष्णन यांची माहिती

Land acquisition survey in six months | सहा महिन्यांत भूसंपादनाचे सर्वेक्षण

सहा महिन्यांत भूसंपादनाचे सर्वेक्षण

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर होणार असून, त्यासाठीचे जिल्ह्यातील भूसंपादन सर्वेक्षण येत्या सहा महिन्यांत द्रुतगतीने पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असेल. चौपदरीकरणासाठी सुमारे १००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील १०३ गावांमधील जमीन या प्रकल्पासाठी संपादित करावी लागणार आहे, अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज, शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी खासदार राऊत यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त आढावा बैठक घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. चौपदरीकरणात या चार तालुक्यांतील १०३ गावे समाविष्ट आहेत. या चार तालुक्यातील भूसंपादनासाठीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यासाठीचे सातबारा उतारेही तयार आहेत. प्रत्यक्ष सर्वेक्षणात कोणाची किती जागा जाणार हे स्पष्ट होणार आहे. उर्वरित पाच तालुक्यांमध्ये सातबारा तयार करणे, चौपदरीकरणाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करणे ही प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. यासाठी १४ पुलांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चौपदरीकरणासाठी मोजणी आणि सर्वेक्षण हे काम किमान सहा महिन्यांत होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील, असे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
लांजाची बाजारपेठ महामार्गावरच असल्याने तेथे उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच राजापूरवासीयांनाही नागमोडी वळणांऐवजी पर्यायी मार्ग हवा आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. ते म्हणाले की, यात समाविष्ट गावांमधील जमीन संपादित करताना नवीन भूमीअधिग्रहण कायद्यानुसारच घेतल्या जातील. मोजणी सदोष होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

सर्वेक्षण होणार चौपट वेगाने
रायगड जिल्ह्यात महामार्ग भूसंपादनाच्या सर्वेक्षण व संपादन प्रक्रियेस दोन वर्षे लागली. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी सहा महिन्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादनाचा प्रस्ताव व सातबारा तयार आहेत. त्यामुळे हे काम जास्तीत जास्त लवकर कसे होईल, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

उदय सामंत अनुपस्थित
चौपदरीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठक व पत्रकार परिषदेस खासदार राऊत यांच्याबरोबर सेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक व शिवसेनेचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. मात्र, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत या कार्यक्रमात कुठेही दिसून आले नाही. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकवीरा देवीच्या दर्शनास सेनेचे अन्य सर्व आमदार उपस्थित होते. मात्र, सामंत अनुपस्थित होते व बैठकीसही अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Land acquisition survey in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.