भूसंपादनास संघाचा पाठिंबा!
By Admin | Updated: March 14, 2015 05:32 IST2015-03-14T05:32:06+5:302015-03-14T05:32:06+5:30
: केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत आहे. काही संघप्रणीत संघटनांचादेखील या विधेयकाला विरोध

भूसंपादनास संघाचा पाठिंबा!
नागपूर : केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत आहे. काही संघप्रणीत संघटनांचादेखील या विधेयकाला विरोध होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पंतप्रधान मोदींची पाठराखण केली आहे. या विधेयकातील बदल हे शेतकरीविरोधी नसून विरोध करणाऱ्या संघटनांशी केंद्राने चर्चा करून त्यावर तोडगा शोधावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आला आहे. शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला प्रारंभ झाला. यावेळी पत्रपरिषदेत सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी संघाची भूमिका मांडली.
केंद्र शासनाच्या या विधेयकाला संघ परिवारातीलच भामसं (भारतीय मजदूर संघ), भाकिसं (भारतीय किसान संघ) या संघटनांचा विरोध आहे. यावर होसबळे यांना विचारले असता केंद्र सरकारने भूसंपादन विधेयकात संशोधन केल्यानंतर आता यात काही शेतकरीविरोधी मुद्दे आहेत, असे वाटत नाही. या दोन्ही संघटना संघाच्या प्रेरणेतून तयार झाल्या असल्या तरी त्यांचे कार्य स्वतंत्र पद्धतीने चालते. त्यांचा विरोध असेल तर त्यांच्याशी केंद्राने चर्चा करावी. या विधेयकाची अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय व्हायला नको असे होसबळे म्हणाले.
देशात सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवर असंतुष्ट होण्याचे काही कारण नाही, असे म्हणत होसबळे यांनी मोदी सरकारची पाठराखण केली. (प्रतिनिधी)