पंकज पाटील , अंबरनाथमुंबई-बडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी भूसंपादनाचे काम सरकारने सुरू केले असून, त्या संदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या महामार्गासाठी अंबरनाथ तालुक्यातील ३९५ सातबाऱ्यांवरील १२६.९८ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे. मुंबई जेएनपीटी ते बडोदरा राष्ट्रीय महामर्गाला मंजुरी मिळाल्यावर या रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वर्षभरापासून प्रलंबित होती. अखेर केंद्र सरकारने या कामाला सुरुवात केली असून, तो ज्या तालुक्यातून जातो, त्या तालुक्याच्या गावांमधील शेतजमीन ताब्यात घेण्याचे काम शासनाने सुरूकेले आहे. शहापूर, कल्याण तालुक्यापाठोपाठ अंबरनाथ तालुक्यातील जागा संपादनाचा प्रश्न प्रलंबित होता. अंबरनाथ तालुक्यातील जागा ताब्यात घेण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. येथील १० गावांमधील शेतजमीन बाधित होत असून, त्यात सर्वाधिक जागा ही बदलापूर आणि एरंजाड गावातील आहे. या रस्त्यांचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यावरच, या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यास बदलापूर आणि अंबरनाथ शहर हे नाशिक महामर्गाला आणि मुंबई - पुणे महामार्गाला जोडले जाणार आहे, तसेच पुण्याला जाण्याठी सर्वात जवळचा रस्ता होणार आहे. >>> बडोदरा -घोडबंदरवरून हा महामार्ग नाशिक महामार्गावरील पडघ्यापर्यंत पूर्ण झाला असून, पडघा ते पनवेलपर्यंतच्या रस्त्याचे काम शिल्लक आहे. या मार्गावरील शेतजमीन अद्याप ताब्यात घेतली नाही. या मार्गावरील सर्वाधिक जमीन ही अंबरनाथ तालुक्यातील आहे. अंबरनाथ तालुक्यातील रस्त्याचे काम हे भोज गावापर्यंत जात असून, पुढे डोंगरातून बोगद्यामार्गे (टनेल) हा रस्ता पनवेलला जोडण्यात येणार आहे. येथून तो मुंबई आणि जेएनपीटीला जोडण्यात येणार आहे.>>> बदलापूर शहरातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार असल्याने, बदलापूर शहर हे सर्व महामर्गांचे केंद्रबिंदू ठरणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि बडोदरा या महामार्गांकडे जाण्यासाठी बदलापूरकरांना आणि परिसरातील शहरांना सोईचे होणार आहे. - किसन कथोरे, आमदार, मुरबाड विधानसभा
भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
By admin | Updated: December 11, 2015 02:05 IST