भूसंपादन विधेयक म्हणजे बकासुरी कायदाच - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: February 26, 2015 09:42 IST2015-02-26T09:39:36+5:302015-02-26T09:42:45+5:30
- भूमी अधिग्रहण हा बकासुरी कायदा शेतक-यांचे अस्तित्व नष्ट करणारा असून शेतक-यांना देशोधडीस लावून सत्तेच्या तुंबड्या भरण्याचे काम आम्ही करणार नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
भूसंपादन विधेयक म्हणजे बकासुरी कायदाच - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - भूमी अधिग्रहण हा बकासुरी कायदा शेतक-यांचे अस्तित्व नष्ट करणारा असून शेतक-यांना देशोधडीस लावून सत्तेच्या तुंबड्या भरण्याचे काम आम्ही करणार नाही अशा आक्रमक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकाला विरोध दर्शवला आहे.
भूसंपादन विधेयकावरुन भाजपाला विरोधकांसोबतच एनडीएतील घटकपक्षांकडूनही विरोध होत आहे. शिवसेनेने यापूर्वीही विधेयकाला विरोध दर्शवला असला तरी गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भूसंपादन विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला. शेतकरी जमिनीवर माऊलीसारखे प्रेम करतो, त्या माऊलीस आपण शेतक-यांकडून हिरावून घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले आहे. देशाचा आर्थिक व औद्योगिक विकास व्हायलाच हवा पण त्यासााठी शेतक-यांच्या बळी नको असेही त्यांनी म्हटले आहे. औद्योगिक घराण्यांसाठी विद्यमान सरकार इस्टेट एजंटची भूमिका निभावत आहे का असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.