कॅम्पाकोलामध्ये लता मंगेशकर यांचा फ्लॅट?
By Admin | Updated: June 10, 2014 15:07 IST2014-06-10T11:03:50+5:302014-06-10T15:07:57+5:30
कॅम्पाकोलावासियांना पाठिंबा दर्शवणा-या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचाच या इमारतीत फ्लॅट असल्याचे समोर आले आहे.

कॅम्पाकोलामध्ये लता मंगेशकर यांचा फ्लॅट?
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० - बिल्डरच्या चुकीची शिक्षा रहिवाशांना नको असे सांगत कॅम्पाकोलावासियांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लता मंगेशकर यांचाच या इमारतीत फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पा कोलामधील इशा-एकता अपार्टमेंटमधील आठव्या मजल्यावरील फ्लॅट खुद्द लता मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यामुळे स्वत:चा फ्लॅट वाचवण्यासाठीच लता मंगेशकर इतर रहिवाशांच्या पाठिशी उभ्या राहिल्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इशा-एकता अपार्टमेंटमधील ८०२ नंबरचा हा फ्लॅट आधी लता मंगेशकर यांच्या एका भाच्याच्या नावावर होता, असे सांगितले जात होते. मात्र तो फ्लॅट लतादीदींच्याच नावावर असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे स्वत:चा फ्लॅट वाचवण्यासाठी लतादीदी कॅम्पा कोलातील रहिवाशांचे समर्थन तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे
' बेकायदेशीर मजले पाडल्यास इमारतीतील हजारो रहिवासी बेघर होतील. या धक्क्यामुळे आजपर्यंत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. बिल्डरांच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांना द्यावी हे अन्यायकारक असल्याचे, ट्विट लता मंगेशकर यांनी केले होते.