णमोकार मंत्राने रचला इतिहास
By Admin | Updated: November 10, 2014 01:07 IST2014-11-10T01:07:08+5:302014-11-10T01:07:08+5:30
मनाला एकाग्रता प्रदान करून आत्म्याला आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या पवित्र णमोकार महामंत्राने उपराजधानीच्या भूमीत एक नवा इतिहास रचला. सकल जैन समाजातर्फे आयोजित भव्य कार्यक्रमात

णमोकार मंत्राने रचला इतिहास
७२ लाख मंत्रांचा जप : जैन समाज बांधवांच्या उपस्थितीत भव्य आयोजन
नागपूर : मनाला एकाग्रता प्रदान करून आत्म्याला आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या पवित्र णमोकार महामंत्राने उपराजधानीच्या भूमीत एक नवा इतिहास रचला. सकल जैन समाजातर्फे आयोजित भव्य कार्यक्रमात णमोकार महामंत्राचा सामूहिकपणे ७२ लाख वेळा जप करण्यात आला. नागपुरातील वर्धमान नगर, भंडारा रोड येथील श्री संभवनाथ जैन मंदिराजवळ आयोजित या उपक्रमाला शहर, विदर्भ तसेच निरनिराळ्या राज्यातील हजारो जैन भाविकांसोबतच समाजातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. णमोकार मंत्राच्या स्वरांमुळे संपूर्ण परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाच्या मंचावर जैन संत आचार्य अपूर्व मंगलरत्नसागरजी महाराज, मुनिश्री प्रशमरति विजयजी, मुनिश्री आगम महाराज साहब, मुनिश्री प्रशम महाराज साहब, सौम्यरत्नाजी, सुरेखाजी, अमिरसाश्रीजी इत्यादी जैन मुनी तसेच साध्वी विराजमान होते. शिवाय अमरस्वरुप परिवाराच्या मातोश्री स्वरुपाबेन मेहता, मनीषभाई मेहता यांच्यासोबत कुटुंबातील सर्व सदस्यदेखील उपस्थित होते. शहरातील सर्वच भागांतून जैन समाजबांधव या आयोजनात सहभागी होण्यासाठी आले होते. पुरुष शांती व पवित्रतेचे प्रतीक असलेल्या श्वेतवर्णीय वस्त्रांत तर महिला लाल व पिवळ्या रंगाच्या वस्त्रांत आल्या होत्या. अनेक धार्मिक व समाजसेवी कार्यांचे प्रेरणास्रोत समाजसेवक दिवंगत अमरचंदभाई मेहता यांची प्रतिमा मंचावर ठेवण्यात आली होती.
अमरचंदभाई यांची पुण्यतिथी बनली ‘जैन एकता दिवस’
नागपुरातील प्रसिद्ध समाजसेवक दिवंगत अमरचंदभाई मेहता यांची पुण्यतिथी आता ‘जैन एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा सकल जैन समाजाचे अध्यक्ष व लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केली. याअगोदर अमरचंदभाई मेहता यांचे पुत्र मनीषभाई यांनी जैन बांधवांकडून ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावाची घोषणा मंचावरून केली होती. विजय दर्डा हे माझ्या वडिलांच्याच समाजातील आहेत. त्यांच्या परवानगीची प्रतीक्षा होती. त्यांनी मंचावरच होकार दिला. त्यामुळे आता हे निश्चित झाले आहे की दरवर्षी हा दिवस ‘जैन एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येईल असे मनीषभाई मेहता म्हणाले.
अतिथींनी दिल्या शुभेच्छा
यावेळी खासदार अजय संचेती यांनी समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पारेख म्हणाले की नागपूर देशाचे मध्य व हृद्यस्थळ आहे. येथे जे काही होते ते देशातील सर्व कोपऱ्यांत पोहोचते. महामंत्र जपाच्या या अनोख्या आयोजनाचा प्रभाव देशभरात पसरेल. यावेळी खासदार कृपाल तुुमाने, महापौर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपड़े, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनीदेखील महामंत्र जपाच्या आयोजनासाठी जैन समाजाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांत जैन सेवा मंडळांचे अध्यक्ष डॉ. संतोष मोदी, भाजपा नेता जयप्रकाश गुप्ता, आभा पांडे, भाजपा नेता सुमत लल्ला जैन, काँग्रेस नेता अतुुल कोटेचा, महेन्द्र कटारिया, उद्योजक अनिल पारख उपस्थित होते.
विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष गणेश जैन, कश्मीरा पटवा, महेन्द्र जैन, दलीप शांतिलाल जैन, प्रकाश मारवडकर, संतोष जैन पेंढारी, सतीश जैन पेंढारी, रजनीश जैन, दिलीप रांका, रमेश शाह, प्रभात धाड़ीवाल, राजेन्द्र लोढ़ा, दीपक जवेरी, रोहितभाई शाह, पीयूष शाह, निहालचंंद जैन, मगनलालभाई दोशी, घनश्याम मेहता, कीर्ति वोरा, अशोक संघवी, दीपक शेंडेकर, अशोक जैन, अभय जैन बीमावाले, रमेश उदेपूरकर यांच्यासमवेत जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
आई-वडिलांची सेवा हे सर्वात मोठे कार्य : खा. दर्डा
सकल जैन समाजाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा म्हणाले की, आजचा दिवस जैन समाजाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस ठरेल. १९९४ साली मी जैनसाध्वी प्रीतिसुधाजी म.सा. यांचा चातुर्मास नागपुरात व्हावा, असे स्वप्न बघितले होते. तेव्हा सकल जैन समाजाचा आवाज उठला होता. आज झालेल्या महामंत्र जपाचे भव्य आयोजनदेखील जैन समाजाच्या एकतेसाठी प्रभावी ठरेल. लोक भक्ती करण्यासाठी मंदिर, स्मारक इत्यादींमध्ये जातात. भक्तीचा उद्देश समाजात एकता निर्माण व्हावी हा असतो. असे उपक्रम यात मोलाची भूमिका पार पाडतात. मनीषभाई यांनी या महान कामासाठी दान करून आई-वडिलांच्या भक्तीचे कार्य केले आहे. येथे ७२ लाख णमोकार महामंत्राचा जप झाल्याने जी ऊर्जा निर्माण झाली आहे ती देशातील सर्व भागांत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्षणचित्रे
-उपराजधानीसोबतच इतर राज्यांतूनदेखील भाविक येथे आले होते.
-या कार्यक्रमात जप करणाऱ्या सर्व भाविकांना माळा देण्यात आल्या.
-शांत वातावरणात सर्वांनी श्रद्धापूर्वक णमोकार मंत्राचा जप केला.
-प्रत्येक जपादरम्यान मुंबईतील संगीतकार वाणी गोता मधुर भजन व गीत सादर करत होते.
-भाविकांसाठी ‘लकी ड्रॉ’ ठेवण्यात आला होता. यात नाव निघालेल्या लोकांना सोन्याची चेन, अंगठी व इतर भेटवस्तू देण्यात आल्या.