दिवाळीत लालपरी टॉप गिअरवर... हंगामी भाडेवाढ पडणार पथ्थ्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 08:38 AM2023-11-10T08:38:20+5:302023-11-10T08:41:15+5:30
एकूण उत्पन्न हे ४५० कोटींहून अधिक असेल. भाडेवाढीमुळे एसटीच्या उत्पन्नात ४५ कोटींची भर पडेल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.
मुंबई : यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाट चालणार आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजना यामुळे एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. एकूण उत्पन्न हे ४५० कोटींहून अधिक असेल. भाडेवाढीमुळे एसटीच्या उत्पन्नात ४५ कोटींची भर पडेल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.
दिवाळी सुटीनिमित्त अनेक जण आपापल्या घरी किंवा आजोळी जात असतात. प्रवाशांची संख्या वाढणार हे गृहीत धरून एसटी महामंडळाने काही दिवस अगोदरच अचूक नियोजन केले आहे. दरवर्षी दिवाळी सुट्या लागल्या की अनेक जण आपापल्या गावी जातात. त्यामुळे दिवाळी सणापूर्वी व दिवाळी सण संपताना प्रवाशांची गर्दी होते. मात्र, एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा फायदा खासगी वाहतूकदार घेत असतात.
ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना वेठीस धरत खासगी वाहतूकदार भाडेवाढ करतात. पण, प्रवाशांनी यंदा एसटीच्या महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि ज्येष्ठ नागरिक अमृत योजना यामुळे खासगी वाहतूकदारांना अल्प प्रतिसाद मिळणार असे चित्र आहे.
दिवाळी हंगामी
भाडेवाढीसह एकूण उत्पन्न
२०१७-१६ : २५६ कोटी ५५ लाख
२०१८-२० : ३४२ कोटी २२ लाख
२०१९-१२ : २५५ कोटी २४ लाख
२०२२-११ : २१८ कोटी ३३ लाख
यंदा एसटीकडून महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, अमृतमहोत्सवी ज्येष्ठ यांना प्रवासात सवलत दिल्यानंतर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः महिला प्रवाशांचे प्रमाण जास्त आहे. यंदा एसटीने केलेल्या दहा टक्के भाडेवाढीमुळे एसटीच्या नियमित उत्पन्नात ४५ ते ५० कोटींची भर पडेल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ