पंचवीस लाखांसाठी ललिताची मुख्यमंत्र्यांकडे ‘धाव’!

By Admin | Updated: September 30, 2015 00:09 IST2015-09-29T21:52:10+5:302015-09-30T00:09:23+5:30

तयारी आॅलिम्पिकची : सातारच्या सुवर्णकन्येचे आर्थिक मदतीसाठी शासनाला साकडे

Lalita's 'Run' to the Chief Minister for 25 lakhs! | पंचवीस लाखांसाठी ललिताची मुख्यमंत्र्यांकडे ‘धाव’!

पंचवीस लाखांसाठी ललिताची मुख्यमंत्र्यांकडे ‘धाव’!

सागर गुजर -- सातारा  --बिजिंग येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक स्पर्धेत विक्रम प्रस्थापित करणारी सातारची सुवर्णकन्या ललिता बाबर या धावपटूने आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून मंत्रालयात धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निधीबाबत साकडे घातले.
माण तालुका फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल माने, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव प्रभाकर देशमुख, ज्ञानेश काळे, भरत चव्हाण, जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे सचिव संजय वाटेगावकर यांच्यासोबत ललिताने नुकतीच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक मदत मिळण्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली.
ललिताने २0१४ मध्ये झालेल्या एशियन गेम्स, २0१५ मधील राष्ट्रीय स्पर्धा व याच वर्षी झालेल्या एशियन ट्रॅक २0 या स्पर्धेत देदिप्यमान कामगिरी केली होती.
या स्पर्धांच्या बक्षिसाची रक्कम जवळपास १५ लाखांच्या घरात आहे, ती ललिताला अद्याप मिळालेली नाही. बिजिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत ९.२७ मिनिटांत शर्यत पूर्ण करून जागतिक स्तरावर ८ वे स्थान तिने मिळविले असल्याने आॅलिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी करण्याच्या आशा वाढल्या आहेत. संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींच्या तिच्याकडून या अपेक्षा आहेत. या अपेक्षांच्या पूर्तीसाठी ललिताची जोरदार धडपड सुरू आहे.
आगामी आॅलिम्पिक स्पर्धेच्या सरावासाठी ती अमेरिकेला दोन महिन्यांच्या कॅम्पसाठी जाणार आहे. यासाठी तिला २५ लाखांचा खर्च येणार असून तिच्या हाती पैसे नाहीत. तिच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राचेच नाव जागतिक पातळीवर कोरले जाणार असल्याने राज्य शासनाने तिला आर्थिक मदत करण्याची गरज आहे. हा निधी मिळावा, यासाठी तिने राज्य शासनाकडे अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री मदत निधीतून ही रक्कम मिळावी, अशी तिने यावेळी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही तिच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ललिताने क्रीडा मंत्री विनोद तावडे यांचीही भेट घेऊन त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांना भेटून तिने आर्थिक मदतीचे पत्र दिले आहे. माण तालुका फाउंडेशनच्या माध्यमातूनही आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा संघटनेने मिळवून दिली मदत
जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशनने ललिताला राज्य शासनाकडून ५ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. इतर खेळाडूंना कोटभर रुपयांची मदत सहज मिळते, तर ललिताला का नाही?, असा युक्तिवाद या संघटनेने राज्य शासनाकडे केला आहे.


आॅलिम्पिकच्या सरावासाठी अमेरिकेला जाण्याआधी मी १0 ते १५ दिवस बेंगलोरला जाणार आहे. या कालावधीत आर्थिक मदत मिळाल्यास मी अमेरिकेला जाऊ शकेन. आलिम्पिक स्पर्धेसाठी मी ९.१५ मिनिटांचे ध्येय निश्चित केले आहे.
- ललिता बाबर, धावपटू

Web Title: Lalita's 'Run' to the Chief Minister for 25 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.