ललिता पंचमीला अंबाबाई गजारूढ रूपात
By Admin | Updated: September 29, 2014 18:42 IST2014-09-29T18:42:01+5:302014-09-29T18:42:11+5:30
दोन जिवलग सखींची भेट आणि कोहळा भेदण्याचा विधी आज, सोमवारी ललिता पंचमीला संपन्न झाला. यानिमित्त शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.

ललिता पंचमीला अंबाबाई गजारूढ रूपात
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केल्यानंतर साजरा झालेल्या विजयोत्सवात तिची प्रिय सखी देवी त्र्यंबोलीचे मात्र विस्मरण होते. तिचा रूसवा काढण्यासाठी स्वत: अंबाबाई आपल्या शाही लव्याजम्यानिशी तिच्या भेटीला जाते. दोन जिवलग सखींची भेट आणि कोहळा भेदण्याचा विधी आज, सोमवारी ललिता पंचमीला संपन्न झाला. यानिमित्त शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.
नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. त्यामुळे सकाळी दहा वाजता शासकीय अभिषेक झाल्यानंतर अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. अंबाबाईने कोल्हासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. त्या कार्यात तिला सखी त्र्यंबोली देवीनेही कामाक्षाचा वध करून तिला सहकार्य केले. मात्र, अंबाबाईच्या विजयोत्सवात त्र्यंबोलीला बोलावणे राहून जाते. त्यामुळे त्र्यंबोलीदेवी अंबाबाईवर रूसून तिच्याकडे पाठ करून बसते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोलीचा रूसवा काढण्यासाठी जाते. यावेळी देवी त्र्यंबोलीने तू कोल्हासुराचा वध कसा केलास, ते मला दाखव अशी इच्छा व्यक्त करते. त्यानुसार अंबाबाई कोल्हासुराचे प्रतीक म्हणून कोहळ््याचा भेद करून त्याचा वध कसा केला ते दाखवते. या कथा भागानुसार दरवर्षी ललिता पंचमीला अंबाबाईची पालखी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते व तेथे कोहळा भेद हा विधी होतो. त्र्यंबोलीच्या भेटीला गजारूढ होऊन अंबाबाई जाते म्हणून यादिवशी ही पूजा बांधली जाते. श्रीपूजक सागर मुनीश्वर व रवी माईणकर यांनी ही पूजा बांधली.