लाल मिरचीला संजीवनी

By Admin | Updated: September 18, 2014 00:50 IST2014-09-18T00:50:06+5:302014-09-18T00:50:06+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाल मिरचीचे भाव दुपटीवर जाण्याचे संकेत होते. पण मध्यंतरी झालेल्या पावसामुळे विदर्भात लाल मिरचीच्या पिकाला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे.

Lal Chile Sanjivani | लाल मिरचीला संजीवनी

लाल मिरचीला संजीवनी

भावावर नियंत्रण : २० ते ३०% भाववाढ
नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाल मिरचीचे भाव दुपटीवर जाण्याचे संकेत होते. पण मध्यंतरी झालेल्या पावसामुळे विदर्भात लाल मिरचीच्या पिकाला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे. त्यामुळे यावर्षी ‘तिखट’ फारसे महाग होणार नाही, अशी शक्यता आहे.
देशात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात होते. विदर्भसुद्धा उत्पादनात आघाडीवर आहे. गुंटूरमध्ये (आंध्र प्रदेश) सध्या २५ ते २८ लाख टन मिरचीचा साठा आहे. त्यामुळे यावर्षी टंचाई जाणवणार नाही. पण मिरचीचे भाव २० ते ३० टक्के वाढीची शक्यता आहे. गेल्या वर्षी ६० रुपये किलो होते. यावर्षी भाव ७५ ते ८० रुपये किलोवर गेले आहेत. याशिवाय निर्यात थांबल्याने भाववाढीवर नियंत्रण आले आहे. सर्वात मोठा खरेदीदार पाकिस्तानमध्ये नवीन माल येणे सुरू झाले आहे. त्यामुळे निर्यात थांबली आहे, अशी माहिती मिरचीचे ठोक व्यापारी प्रकाश वाधवानी यांनी दिली.
कळमन्यात आवक वाढली
विदर्भातील सर्वात मोठ्या कळमना बाजारात आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून लाल मिरचीची आवक होते. या ठोक बाजारात संपूर्ण विदर्भातून खरेदीदार येतात. शिवाय मिरचीपासून तिखट तयार करणारे उत्पादकसुद्धा याच बाजारातूनच खरेदी करतात. यंदा अंतिम टप्प्यात पाऊस आल्याने मिरचीचे भाव वाढले नाहीत. त्यामुळे चांगल्या दर्जाची मिरची महाग होणार नाही. गेल्यावर्षी मुसळधार पावसामुळे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे एकूण उत्पादन केवळ ११ लाख टनापर्यंत पोहोचले होते.
आशियाई देशांमध्ये मिरचीला मागणी
चीन आणि बांगला देशातून मिरचीला चांगली मागणी आहे. तज्ज्ञांनुसार गुंटूर येथील साठा नोव्हेंबरमध्ये संपू शकतो. तोपर्यंत मध्य प्रदेशातून नवीन आवक सुरू होईल. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला साठा जानेवारीपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. यावर्षी मिरचीची निर्यात वाढीचे संकेत दिसत आहेत. थायलंडसुद्धा भारतातून मिरचीची खरेदी करीत आहे. चीनमध्ये मुसळधार पावसामुळे चांगल्या प्रतिच्या मिरचीचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे त्यांची खरेदी भारतातून सुरू आहे. आतापर्यंत चीनमधून चांगली मागणी राहिली आहे.

Web Title: Lal Chile Sanjivani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.