सरस्वतीच्या उपासनेसाठी लक्ष्मीची पावले
By Admin | Updated: March 1, 2017 05:30 IST2017-03-01T05:30:55+5:302017-03-01T05:30:55+5:30
परीक्षा केंद्रावर जन्मत: दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी संजय शिंदे हिने बारावीचा इंग्रजीचा पेपर पायात लेखणी धरून लिहून पूर्ण केला

सरस्वतीच्या उपासनेसाठी लक्ष्मीची पावले
यशवंत सादूल,
सोलापूर- सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जन्मत: दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी संजय शिंदे हिने बारावीचा इंग्रजीचा पेपर पायात लेखणी धरून लिहून पूर्ण केला. विद्यादेवतेची आराधना करण्यासाठी तिच्या अंगी असलेल्या अंतरिक जिद्दीने सबंध परीक्षागृहातील परीक्षार्थींसह पर्यवेक्षकही थक्क झाले.
हैदराबाद रोड, विडी घरकूल येथील गोंधळी वस्तीत १० बाय १२च्या पत्राशेडमध्ये राहणारी लक्ष्मी ही रिक्षाचालकाची मुलगी. जन्मत: दोन्ही हातांनी अपंग असलेल्या लक्ष्मीला शाळेला पाठविणे तसे दुरपास्तच होते. मात्र जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या बालवाडीकडे तिची पावले आपसूकपणे वळली. दिवसभर शाळेबाहेर बसून ती गाणी ऐकायची. बडबडगीते म्हणायची.
तिची शाळेबद्दलची आस्था पाहून वडिलांनी शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यासाठी विनंती केली. पण दोन्ही हात नसल्याने तिला प्रवेश नाकारण्यात आला. तरीही लक्ष्मी शाळेजवळ जाऊन बसायची.
एके दिवशी मुख्याध्यापकांनी पालकाच्या जबाबदारीवर तिला बालवाडीत प्रवेश दिला. लिहिता येत नसले तरी ती अभ्यासात अन्य मुलींसारखी होती. इतरांच्या मदतीने परीक्षा देत ती सातवीपर्यंत पोहोचली. संभाजीराव शिंदे प्रशालेत आठवीत असताना तिने ठरविले, काही झाले तरी आपण स्वत: पेपर लिहायचा. मग ठरले. अथक प्रयत्नांनंतर तिने पायात पेन धरून नववीचा पेपर दिला. मार्च २०१५मध्येही तिने दहावी बोर्डाची परीक्षा स्वत:च्या पायाने लिहून
दिली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेत जायची तिची इच्छा आहे.
>जन्मत: दिव्यांग असलेल्या लक्ष्मीचं पुढचं भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाचे कौतुक सर्वप्रथम ‘लोकमत’ने केल्यानंतर अनेक संस्थांनी मदतीचा हात दिला.