लाही लाही!
By Admin | Updated: March 26, 2015 02:16 IST2015-03-26T02:16:54+5:302015-03-26T02:16:54+5:30
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्चचा पहिला पंधरवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर राज्यावर आता उष्णतेची लाट आली आहे.

लाही लाही!
राज्यभरात उन्हाचा मार्चमध्येच तडाखा : मुंबईत अंगणवाडी सेविकेचा उष्माघाताने मृत्यू
भिरा येथे सर्वाधिक ४३.५ अंशाची नोंद
पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्चचा पहिला पंधरवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर राज्यावर आता उष्णतेची लाट आली आहे. बुधवारी अनेक शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या वर गेले होते. भिरा येथे सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक आहे. मुंबईत आंदोलनलादरम्यान एका अंगणवाडी सेविकेचा उष्माघाताने मृत्यू झाला.
मध्य महाराष्ट्राच्या कमाल आणि किमान तापमानात बुधवारी लक्षणीय वाढ नोंदविली गेली. भिरापाठोपाठ मुंबई, मालेगाव व सोलापूरचे तापमान प्रत्येकी ४०.८ अंश, अकोल्याचे तापमान ४०.५ अंश, चंद्रपूर ४०.४, जळगाव ४०.३ अंश, उस्मानाबादचे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. किमान तापमानही वेगाने वाढू लागल्याने रात्रीच्या उकाड्यातही वाढ होत आहे. बहुतांश शहरांचे किमान तापमान २१ अंशाच्या वर गेले आहे.
मुंबईचा पारा ४०.८ अंशांवर
मुंबईचा पारा बुधवारी तब्बल ४०.८ अंश सेल्सिअसवर गेला. मार्च महिन्यात या मोसमात आतापर्यंत नोंदविण्यात आलेले शहरातील सर्वाधिक कमाल तापमान आहे.
पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्याची तीव्रता वाढल्याने राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
पुढील चार दिवस राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता.
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान
पुणे ३७.७, जळगाव ४०.३, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४०.८, नाशिक ३८.५, सांगली ३७.४, सातारा ३८.२, सोलापूर ४०.८, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३४.४, डहाणू ३४.८, भिरा ४३.५, उस्मानाबाद ४०, औरंगाबाद ३८.४, परभणी ३९.१, अकोला ४०.५, अमरावती ३७.८, बुलडाणा ३७.२, ब्रम्हपुरी ३९.७, चंद्रपूर ४०.४, नागपूर ३९.८, वाशिम ३८.२, वर्धा ३९, यवतमाळ ३६.८.
(आकडेवारी अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबईत मार्चमधील ‘ताप’दायक दिवस
दिवसतापमान
५ मार्च १९१८४०.४
२८ मार्च १९५६४१.७
१६ मार्च २०११४१.६
२५ मार्च २०१५४०.८