कल्याण : ‘लाडकी बहीण योजना’ कधीही बंद होणार नाही. महायुती सरकारची आमची टीमही तीच आहे. त्याचबराेबर आमचे डबल इंजिनचे सरकारही तेच आहे. सरकारमध्ये प्रिंटिंग मिस्टेक होत नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.
कल्याण-डोंबिवली पालिकेत पीपीपी तत्त्वावर १० वर्षांसाठी सुमित एल्को कंपनीला कचरा वाहतूक संकलन आणि शहर स्वच्छता प्रकल्पाचे काम दिले. प्रकल्पाचा प्रारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आ. रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिंदेसेनेचे आ. राजेश मोरे, आ. सुलभा गायकवाड, आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह सुमित कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दामिनी पथकाला १६ दुचाकी दावडी येथे टाटा, केडीएमसी आणि एमआयडीसीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या टाटा कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते झाले. टिटवाळ्यातील पर्यावरणाभिमुख उद्यानाचे लोकार्पण, खंबाळपाड्यातील स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे ऑनलाइन उद्घाटनही केले. मध्य रेल्वे यार्ड प्रकल्पातील बाधितांना घरांच्या चाव्या, दामिनी पथकातील महिला पोलिसांना १६ दुचाकीच्या चाव्याही त्यांच्या हस्ते दिल्या. कल्याण-डोंबिवली एक नंबरला हवे कल्याण, डोंबिवली स्वच्छतेबाबतीत एक नंबरला आले पाहिजे, अशी सूचना शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना केली.