Ladki Bahin Yojana: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेली आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. परंतु, याची पूर्तता कधी होईल, याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे. यातच आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले आहे.
सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर वचनभंगाचा आरोप केला. परंतु, या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत शिवराज सिंह चौहान यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे.
लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात आहे
लाडकी बहीण योजना राज्य सरकारने तयार केली आहे आणि राज्य सरकार ती चालवत आहे. या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून चालवली जात आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारचा संकल्प लखपती दीदी आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लखपती दीदी असा संकल्प घेऊन केंद्र सरकार पुढे जात आहे. याचा अर्थ असा की, महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत जावे. म्हणजेच महिन्याला १० हजारांची मिळकत व्हावी. ३ कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींचा आहे. माझा विभाग त्यावर काम करत आहे. ०१ कोटी ४८ लाख लाभार्थी महिलांनी लखपती दीदी योजनेचा लाभ घेतला आहे. यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गरीब महिलांना पैशांसाठी कोणापुढेही हात पसरू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महिलांनाही हाताला काम मिळायला हवे, त्यांनाही प्रशिक्षण मिळायला हवे. वेगवेगळ्या उद्योगांशी त्या संपर्कात याव्यात. त्या माध्यमातून त्यांना काम मिळावे. काही ठिकाणी तर महिला यातून १० लाख रुपये वर्षाला कमवत आहेत. गरिबी हटवण्याचे एक मोठे आंदोलन सुरू असून, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासाठी कटिबद्ध आहेत, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.