24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, संततधारमुळे लोकल सेवा मंदावली
By Admin | Updated: June 28, 2017 09:32 IST2017-06-28T07:45:42+5:302017-06-28T09:32:11+5:30
मुंबईसह राज्यात बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, संततधारमुळे लोकल सेवा मंदावली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.28 - मुंबईसह राज्यात बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलची वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहे. यामुळे ऐन गर्दी व कार्यालय गाठण्याच्या वेळेस चाकरमान्यांचे हाल होत आहेत. तर आज दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी मोठी भरती येणार आहे.
‘मुसळधार’चा इशारा
बुधवारी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. गुरुवारी कोकण-गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने वर्तविले आहे.
मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीला गती येण्यासाठी व पिकाची उगवण होण्यासाठी चांगला पाऊस अपेक्षित आहे.
राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून मंगळवारी मुंबई, ठाणे व नागपूरमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. पश्चिम वऱ्हाडातही पावसाचे दमदार आगमन झाले. मुंबईत पावसामुळे सकाळी लोकलचा वेग मंदावला. नागपूरच्या काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. अकोला, वाशिम जिल्ह्यांतही वरुण बरसला. ठाणे जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून कोसळणारा पाऊस मंगळवारी दिवसभर सुरूच होता.
नाशिक जिल्ह्यात ईगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर येथे पावसाने हजेरी लावली. पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडल्याने मुंबईहून नाशिक आणि नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. लांब पल्ल्यांच्या गाड्याही उशिराने धावत होत्या.