काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सुविधांचा अभाव
By Admin | Updated: April 28, 2016 03:35 IST2016-04-28T03:35:59+5:302016-04-28T03:35:59+5:30
डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह बाहेरुन चांगले दिसत असले तरी आतून या नाट्यगृहाची रया गेली आहे. खुर्च्या, एसी, कॉन्फरन्स रुम, रेस्टरुम, प्रशस्त पार्किंग व्यवस्था यांच्यासह इतर चांगल्या सुविधा दिल्या

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सुविधांचा अभाव
- अजित मांडके,
ठाणे- डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह बाहेरुन चांगले दिसत असले तरी आतून या नाट्यगृहाची रया गेली आहे. खुर्च्या, एसी, कॉन्फरन्स रुम, रेस्टरुम, प्रशस्त पार्किंग व्यवस्था यांच्यासह इतर चांगल्या सुविधा दिल्या गेल्या असल्या तरी प्रत्येक मजल्यावर स्लॅबला सुरु असलेली गळती, काही भाग कोसळलेले, मेकअप रुमची दूरवस्था, प्रसाधनगृहांमध्ये असलेली दुर्गंधी, कंट्रोल रुममधील सिलिंग केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेले आणि कँटीनचा केवळ उभा असलेला सांगडा यामुळे नाट्यगृह तसे चांगले... पण सुविधांअभावी खुंटीला टांगले असेच म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे.
एसीमधील पाण्याच्या लिकेजमुळेच डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मुख्य प्रेक्षक गॅलरीचे छत कोसळल्याचे प्राथमिक निरीक्षण तांत्रिक सल्लागारांनी नोंदवले आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही बुधवारी नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर तातडीने नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत तांत्रिक अहवाल आल्यानंतर या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्याविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. सोमवारी रात्री उशिरा छताचा भाग कोसळल्यानंतर नाट्यगृहाच्या देखभालीबाबत पालिका प्रशासन किती गंभीर आहे हे देखील स्पष्ट झाले. नाट्यगृहात अनेक ठिकाणी वेगवेगळ््या मार्गाने पाण्याची गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून त्यातून लाकडाचे-प्लायवूडचे सामान कुजले. त्याचा भार बाल्कनीच्या फॉल्स सिलिंगला पेलवला नसल्याने हा भाग कोसळल्याचा अंदाज व्यक्त सुरूवातीला व्यक्त करण्यात आला होता.