सिलिंडरचा तुटवडा
By Admin | Updated: August 20, 2014 01:10 IST2014-08-20T01:10:09+5:302014-08-20T01:10:09+5:30
घरगुती सिलिंडरचा तुटवडा असल्याने सणासुदीच्या तोंडावर नागरिकांचे हाल सुरू आहेत. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना दाही दिशा फिरावे लागत असून गॅस एजन्सींच्या कार्यालयाबाहेर

सिलिंडरचा तुटवडा
ग्राहक वेटिंगवर : काळ्याबाजारात दर हजारावर!
नागपूर : घरगुती सिलिंडरचा तुटवडा असल्याने सणासुदीच्या तोंडावर नागरिकांचे हाल सुरू आहेत. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना दाही दिशा फिरावे लागत असून गॅस एजन्सींच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होत आहे. काळ्या बाजारात सिलिंडर हजारावर मिळत असल्याची धक्कादायक माहिती आहे. यासंदर्भात प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.
सिलिंडरचा काळाबाजार
एचपीसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या भटिंडा येथील रिफायनरीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर रिफिलिंगसाठी आवश्यक बल्कचे उत्पादन कमी झाले आहे. याशिवाय नवीन सिलिंडरचाही पुरवठा कमी असल्याची माहिती आहे. छुप्यारीतीने चालणारा गॅसचा काळाबाजार टंचाईमुळे आता उघड उघड सुरू आहे. सामान्य माणसाला घरगुती वापराच्या गॅससाठी दररोज एजन्सीच्या दुकानात हेलपाटे मारावे लागत आहेत. ‘गाडी आली नाही’ असे सांगून सिलिंडर नाकारले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून महिला वर्ग वैतागला आहे. ओळखी काढून सिलिंडर मिळावे म्हणून ग्राहकांचा आटापिटा सुरू आहे. गॅस एजन्सींनी आपले मनमानी धोरण राबवून ग्राहकांची अडवणूक सुरू केली असून त्याला नियंत्रण बसायला हवे, असे मत एका ग्राहकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
वाहनांमध्ये घरगुती गॅस
घरगुती ग्राहकांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसताना वाहनधारक व व्यावसायिक वापरासाठी मात्र या गॅसचा सर्रास उपयोग सुरू असल्याचे दिसून येते. शहरात गॅसचे पंप फार कमी आहेत. या तुलनेत गॅसवर धावणाऱ्या गाड्या जास्त आहेत. जीवनावश्यक कायद्यांतर्गत स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस वाहनांमध्ये वापरता येत नाही.
ुसिलिंडरची मागणी वाढली
नागपुरात सर्वाधिक ग्राहक हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे आहेत. याच कंपनीच्या सिलिंडरचा सर्वाधिक तुटवडा आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला. भारत, एचपी व इंडेन गॅस कंपन्यांकडे हजारो सिलिंडरची बुकिंग पेडिंग आहेत. पुरेसा लोड (एक ट्रक ३०६ सिलिंडर) येत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले.
आॅगस्टमध्ये रमजान ईद आणि श्रावण महिना सुरू असल्याने सिलिंडरची मागणी अचानक वाढली. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने वेटिंग वाढत गेले. आॅनलाईन बुकिंग करूनही सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांची भटकंती सुरू आहे. लोकांच्या अडचणीची दखल एजन्सीकडूनही घेतली जात नसल्यामुळे अनेक कुटुंबांना त्याची झळ बसली आहे. दुसरीकडे अनेक टपरीचालक, चहाची दुकाने, कॅन्टीन, उपाहारगृह आणि हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा उघड वापर केला जात आहे. (प्रतिनिधी)