मुंबई : दूध भेसळ हा गंभीर प्रश्न असून तो रोखण्यासाठी जिल्हानिहाय प्रयोगशाळा उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना बापट म्हणाले की, सामान्य माणसालाही दुधाची तपासणी करता यावी यासाठी दूध भेसळ ओळखणारी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. यासंदर्भात अधिक कठोर कायदे तयार करण्यात येतील. दुधासोबतच फळे, भाजीपाला, अन्न पदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याबाबत तसेच विशेष पथक नेमण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात येतील, असेही बापट यांनी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य अर्जुन खोतकर, राहुल कुल, सरदार तारासिंग यांनी भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)
दुधासाठी प्रयोगशाळा
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST