लेबर सप्लायरचे १२ लाख लंपास
By Admin | Updated: August 28, 2016 22:30 IST2016-08-28T22:30:30+5:302016-08-28T22:30:30+5:30
मोबाईल बंद करून डुप्लीकेट सीम कार्ड घेतल्यानंतर त्या आधारे एका आरोपीने मोबाईलधारकाच्या खात्यातून १२ लाख रुपये वळते करून घेतले

लेबर सप्लायरचे १२ लाख लंपास
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - काही वेळेसाठी मोबाईल बंद करून डुप्लीकेट सीम कार्ड घेतल्यानंतर त्या आधारे एका आरोपीने मोबाईलधारकाच्या खात्यातून १२ लाख रुपये वळते करून घेतले. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी फसवणूकीची ही अफलातून तेवढीच खळबळजनक घटना घडली.
खामल्यातील परिजा अपार्टमेंटमध्ये नंदकिशोर पंजाबराव गव्हारकर (वय ५२) हे राहतात. अभिजीत इंटेलिजन्स सिक्युरीटी अॅण्ड लेबर सप्लायर नावाने त्यांचे कार्यालय असून, सारस्वत बँकेच्या धंतोली शाखेत त्यांचे खाते आहे. या खात्याशी संलग्न (रजिस्टर) असलेला गव्हारकर यांचा मोबाईल क्रमांक माहिती असलेल्या आरोपीने फसवणूकीचा कट रचला. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजता गव्हारकर यांचा मोबाईल अचानक ब्लॉक झाला. रात्री १० पर्यंत तो बंद होता. या कालावधीत आरोपीने डुप्लीकेट सीमकार्ड मिळवले. त्याचा वापर करून गव्हारकर यांच्या खात्यातून १२ लाख रुपये दुस-या खात्यात वळते करून घेतले.
चक्क १२ लाख रुपयांचा गंडा घातला गेल्याची माहिती कळाल्याने हादरलेल्या गव्हारकर यांनी शनिवारी धंतोली ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. ज्या खात्यात रक्कम जमा झाली, ते कुणाचे आहे त्याची माहिती काढून आरोपीला पकडण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.
गुन्ह्याची चक्रावणारी पद्धत
आॅनलाईन फसवणूकीचे गुन्हे उपराजधानीत नेहमीच घडतात. मात्र, एखाद्याचा मोबाईल बंद करून, त्याचे डुप्लीकेट सीमकार्ड मिळवून अशी योजनाबद्दध पद्धतीने रक्कम लंपास करण्याचा अफलातून गुन्हा पहिल्यांदाच घडला आहे. त्यामुळे चक्रावलेले पोलीस आरोपीला हुडकून काढण्यासाठी सक्रीय झाले आहे.