कामगार कायद्यात बदल नाही - मेहता
By Admin | Updated: April 8, 2015 01:13 IST2015-04-08T01:13:34+5:302015-04-08T01:13:34+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेकरिता कामगार कायद्यात बदल करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही.

कामगार कायद्यात बदल नाही - मेहता
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेकरिता कामगार कायद्यात बदल करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. कायद्यात कुठलाही बदल करायचा झाल्यास सर्वपक्षीय समिती स्थापन केली जाईल, अशी ग्वाही कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, भाई जगताप आदी सदस्यांनी याबाबत चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्यावरील चर्चेला मेहता यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कामगार कायद्यात बदल करणार ही चर्चा तथ्यहीन आहे. असा कुठलाही विचार नाही. मात्र तशीच गरज भासली तर सदस्यांना विश्वासात घेतले जाईल. कंत्राटी कामगार कायद्यामुळे राज्यातील कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने कामगार, कर्मचारी नेमण्याचा पुनर्विचार केला पाहिजे, असे मेहता म्हणाले. कामगार मंडळाच्या नियुक्त्या महिन्याभरात करु, असेही त्यांनी जाहीर केले. केंद्र सरकार कामगारांबाबत काही कायदे करु पाहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून याबाबत कसे पुढे जावे याचे मार्गदर्शन करण्याची विनंती करता येईल. कारण हे दोन नेते आठवड्यातून दोनवेळा भेटतात व निवांत चर्चा करतात हे त्यांनीच सांगितले आहे, याकडे मेहता यांनी लक्ष वेधले. (विशेष प्रतिनिधी)