कथ्थकसम्राट संदीप महावीरविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 1, 2017 06:19 IST2017-03-01T06:19:47+5:302017-03-01T06:19:47+5:30
फसवणूक केल्याप्रकरणी कथ्थकसम्राट संदीप महावीर यांच्याविरुद्ध मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कथ्थकसम्राट संदीप महावीरविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : शेअर ब्रोकरला पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कथ्थकसम्राट संदीप महावीर यांच्याविरुद्ध मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे कलाक्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.
महावीर हे देशातील प्रसिद्ध कथ्थकसम्राट असून, त्यांचे देश-विदेशांत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. बिस्मिला खान युवा पुरस्काराने महावीर यांना सन्मानित करण्यात आले होते. मरिन ड्राइव्ह परिसरात तक्रारदार मनिष शहा हे कुटुंबासोबत राहतात, ते शेअर ब्रोकर आहेत. महावीर दिवसातून दोन तास त्यांच्या पत्नीला कथ्थक शिकवायला येते होते. या दरम्यान शहा यांच्यासोबत त्यांची ओळख वाढली. त्यात व्यावसायिक व्यवहारांच्या चर्चाही होत होत्या. महावीर यांनी शहा यांना नृत्याच्या कार्यक्रमांत पैसे गुंतविण्यास सांगितले. यात जास्तीचे पैसे मिळण्याचे आमिष दाखविल्याने शहाही तयार झाले. त्यांनी यामध्ये तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र पैसे गुंतवूनही काही फायदा होत नसल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा मात्र महावीर त्यांना टाळू लागले. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहा यांनी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)