क्षत्रिय नवे मुख्य सचिव
By Admin | Updated: August 1, 2014 04:36 IST2014-08-01T04:36:08+5:302014-08-01T04:36:08+5:30
राज्याच्या मुख्य सचिवपदी स्वाधीन क्षत्रिय यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ तब्बल अडीच वर्षांचा असेल

क्षत्रिय नवे मुख्य सचिव
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी स्वाधीन क्षत्रिय यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ तब्बल अडीच वर्षांचा असेल. मावळते मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. क्षत्रिय हे आतापर्यंत अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) होते.
उच्चविद्याविभूषित क्षत्रिय हे १९८०च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी असली तरी त्यांना उत्तम मराठी येते. तसेच रशियन भाषेचाही चांगला अभ्यास आहे. ते एमए (राज्यशास्र) आणि पीएच.डी. आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सचिव, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे. राज्याच्या विविध विभागांमध्ये काम केल्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. ते केंद्रात प्रतिनियुक्तीवरही होते. महसूल विभागाचे प्रधान सचिव, गृहनिर्माण व इमारत दुरुस्ती मंडळाचे उपाध्यक्ष, बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले. विधानसभा निवडणूक, नव्या सरकारची स्थापना, प्रशासनाला गतिमानता देणे आदी आव्हाने त्यांच्यासमोर असतील. जानेवारी २०१७पर्यंत क्षत्रिय हेच मुख्य सचिव राहणार असल्याने सध्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेले मेधा गाडगीळ, सुधीर श्रीवास्तव, के.पी. बक्षी, यूपीएस मदान, पी.एस. मीना यांच्यापैकी कोणालाही मुख्य सचिवपदाची संधी मिळणार नाही. (विशेष प्रतिनिधी)