कोथरूडमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प?

By Admin | Updated: May 7, 2017 03:37 IST2017-05-07T03:37:21+5:302017-05-07T03:37:21+5:30

उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुमारे ७०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्प कोथरूड येथे स्थलांतरित

Kothrud waste processing project? | कोथरूडमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प?

कोथरूडमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प?

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुमारे ७०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्प कोथरूड येथे स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानभवन येथे शनिवारी (दि. ६) राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थित कचराप्रश्नावर झालेल्या बैठकीत या जागेबाबत चर्चा झाली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. चांदणी चौकाजवळील पाण्याची टाकी परिसरात बीडीपीमधील जागेत हा प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता असून, यासाठी आवश्यक असलेली जागा देण्यास एका जागामालकाने संमती दर्शविली असल्याचेही सांगण्यात आले आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास शहराच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा निघण्यास मदत होईल.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी शहरातील कचरा येथील डेपोत टाकण्यास बंदी घातली आहे. यासाठी गेल्या २१ दिवसांपासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असून, शहरामध्ये प्रचंड कचराकोंडी निर्माण झाली आहे. या कचराकोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांना बैठक घेण्यास सांगितले. परंतु ग्रामस्थांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याने शिवतारे यांनी या बैठकीत केवळ कचरा प्रश्नाचा आढावा घेतला. यात महापालिकेने शहरातील कचरा शहरामध्येच जिरविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर झालेल्या चर्चेमध्ये कोथरूड येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी जाग देण्यास एक जागामालक तयार असल्याचे सांगण्यात आले.
उरुळी देवाचीच्या ग्रामस्थांच्या विरोधानंतर महापालिकेच्या वतीने पर्यायी जागांचा शोध घेण्यात आला. यासाठी पिंपरी सांडस येथील जागेचा प्रस्ताव देण्यात आला. या जागेसाठी येथील स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेची चांगली कचराकोंडी झाली आहे. बैठकीमध्ये या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. त्यानंतर शिवतारे यांनी आपल्या परिचयातील एका व्यावसायिकाची कोथरूड येथे सात एकर जागा असल्याचे सांगत संबंधित जागामालकाला संपर्क केला. हा जागामालक योग्य मोबदला मिळाल्यास आपली जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी देण्यास तयार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यातील कचऱ्याच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकजूट दाखविली आहे. पिंपरी सांडस येथे कचरा डेपोसाठी जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली; परंतु ग्रामस्थांचा विरोध आहे. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील गावांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही गावात आता कचरा डेपो होऊ देणार नाही, असा निर्धार केला आहे.


उरुळी देवाची कचरा डेपो दहा वर्षांपासून, १६३ एकर जागा


१६३ एकर जागेत उरुळी देवाची येथील कचरा डेपो विस्तारलेला असून, गेल्या दहा वर्षांपासून येथे कचरा टाकला जात होता. त्यानंतर येथे ओपन डम्पिंग करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला. यामुळे महापालिकेच्या वतीने १ हजार टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला. केंद्र शासनाच्या मदतीने सुरू करण्यात आलेला हा प्रकल्पदेखील सन २०१४ मध्ये बंद पडला.
शहरात निर्माण होणाऱ्या १६०० टन कचऱ्यापैकी एक हजार टन कचऱ्यावर सध्या प्रक्रिया करणे महापालिकेला शक्य आहे. त्यानंतरदेखील सुमारे ६०० टन मिश्र कचऱ्याची समस्या कायम आहे. त्यामुळे उरुळी देवाची येथील कचरा डेपोच्या सुमारे ७ एकर जागेत ७०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभाण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे.
परंतु ग्रामस्थांनी या प्रकल्पासदेखील प्रचंड विरोध केला असून, कोणत्याही परिस्थितीत शहरातील कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
पिंपरी सांडस येथील कचरा डेपोच्या विरोधात परिसरातील गावांनी आता एकी केल्याने प्रश्न चिघळला आहे. दि. १५ मे रोजी वाघोली येथे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे जागा ताब्यात येऊनही प्रशासनाला काम सुरु करता येणार नाही.


163 एकर जागेत उरुळी देवाची येथे १ हजार टन क्षमतेचा कचरा डेपो
2014 मध्ये केंद्र शासनाच्या मदतीने सुरू केलेला हा प्रकल्प बंद पडला
1600टन : शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य.
600 टन मिश्र कचऱ्याची समस्या
700 टन कचरा प्रक्रिया प्रकल्प ७ एकर जागेत उभाण्याचा प्रस्ताव

इतिहासाची पुनरावृत्ती
शिवसेनेचे तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार यांनी वीस वर्षांपूर्वी कोथरूड येथील कचरा डेपो हलविण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर १९९७ मध्ये हा डेपो उरुळी देवाची येथे हलविण्यात आला. आता पुन्हा उरुळी देवाची येथील सर्वांत मोठा कचरा प्रक्रिया प्रकल्प कोथरूड  येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या वेळीदेखील शिवसेनेचे राज्यमंत्री असलेल्या शिवतारे यांनी ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी  पुढाकार घेतला आहे. वीस  वर्षांनंतर पुन्हा कचरा डेपोच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता रंगली होती.

Web Title: Kothrud waste processing project?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.