‘कोसला’कार नेमाडेंना ज्ञानपीठ
By Admin | Updated: February 7, 2015 03:07 IST2015-02-07T03:07:31+5:302015-02-07T03:07:31+5:30
‘समीक्षा हेच जीवनध्येय मानून दिलेल्या योगदानातून मराठी साहित्यविश्वात स्वत: ‘सूर्य’ झालेले ज्येष्ठ समीक्षक प्रा. भालचंद्र नेमाडे सुवर्णमहोत्सवी ‘ज्ञानपीठ’ सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.

‘कोसला’कार नेमाडेंना ज्ञानपीठ
सुवर्णमहोत्सवी मानकरी : अनवट साहित्य व समीक्षेचा गौरव, मराठीतील चौथे साहित्यिक
नवी दिल्ली : ‘समीक्षा हेच जीवनध्येय मानून दिलेल्या योगदानातून मराठी साहित्यविश्वात स्वत: ‘सूर्य’ झालेले ज्येष्ठ समीक्षक प्रा. भालचंद्र नेमाडे सुवर्णमहोत्सवी ‘ज्ञानपीठ’ सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
हा सन्मान लाभलेल्या
५० प्रतिभावंतांपैकी ते चौथे मराठी साहित्यिक आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी ऐरणीवर आलेली असतानाच मराठीच्या वाट्याला आलेल्या या सर्वोच्च सन्मानाने ‘उदाहरणार्थ... वगैरे’ अंगानेही महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
हा पुरस्कार म्हणजे माझ्या आजवरच्या समीक्षेची पुंजी. यातून आणखी साहित्यनिर्मिती करण्यासाठी मला हुरूप आला आहे. मराठी जाणणाऱ्या प्रत्येकाला यामुळे आनंदच झाला असेल.
- भालचंद्र नेमाडे
मराठी साहित्य सुधारतेय!
भालचंद्र नेमाडे ल्ल
वाचकांची पातळी आणि समीक्षकांचा दर्जा हे एकत्र जमून आले तरच हा योग जुळून येतो. मराठीत यापूर्वीही अरुण कोलटकर, विजय तेंडुलकर, भाऊ पाध्ये, दिलीप चित्रे यांनाही ‘ज्ञानपीठ’ मिळण्यास काहीच हरकत नव्हती. मात्र त्यांच्यावर विशिष्ट लेखन पद्धतीचे शिक्कामोर्तब झाल्याने ‘ज्ञानपीठ’ मिळू शकला नाही, याची खंत कायमच राहील. सुदैवाने मराठीत वातावरण बदलत आहे, याचे समाधान आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्यासाठी वाचकांच्या अभिरुचीचा भागही महत्त्वाचा असतो, तो यंदा जुळून आला. हा निव्वळ जुगाराचाच भाग आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आम्ही केंद्र सरकारशी झगडत असतानाच हा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. आपण भाषेसाठी काहीतरी केले तर भाषा आपल्यासाठी काहीतरी करते. त्यामुळे मनोभावे सेवा केल्याने मायमराठीनेच मला हा पुरस्कार दिला आहे. काही लोकांनी वेगवेगळ्या पूर्वग्रहांमुळे ‘मराठीपण’ संकुचित केले आहे. मात्र ज्ञानेश्वरी, महानुभवापुरते मर्यादित नसून त्याचा आवाका मोठा आहे. मी सातत्याने टीका करीत आलो, आपल्या मूल्यांच्या आग्रहासाठी धडपडत आलो. यापुढेही माझी हीच भूमिका राहील.
आगामी घुमान येथील साहित्य संमेलन हे मोडकळीस आलेले आहे. ते बंद झालेलेच बरे, त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. साहित्य संमेलनावर वेळ घालवून काहीच उपयोग नाही, केवळ वाद आणि विशिष्ट वर्गापुरती केलेली वायफळ धडपड म्हणजेच साहित्य संमेलन आहे.
तीन पिढ्यांचे वाचकप्रिय लेखक
मराठी साहित्यातील समीक्षा करीत असतानाच ‘देशीवाद’ हा त्यांच्या लेखनाचा गाभा राहिला आहे. ते मराठीमधील तीन पिढ्यांचे वाचकप्रिय लेखक आहेत. ते सर्वस्पर्शी व सर्वप्रतिष्ठित साहित्यिक आहेत, अशा शब्दांत हा सन्मान जाहीर करताना नेमाडे यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा बहुमान भारतीय ज्ञानपीठाने केला आहे.
च्वास्तवाची चाकोरीबाहेरची कठोर समीक्षा करणारे लेखक अशी त्यांची ख्याती असून, नेमाडे यांना जाहीर झालेला सन्मान ज्ञानपीठाचा ५०वा सन्मान आहे.
च्प्रख्यात समीक्षक डॉ. नामवर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानपीठ निवड समितीची शुक्रवारी बैठक झाली. रमाकांत रथ, नित्यानंद तिवारी, सुरजित पातर, चंद्रकांत पाटील, सुरंजन दास, अलोक रॉय, दिनेश सिंह, दिनेश मिश्र व ज्ञानपीठचे संचालक लीलाधर मंडलोई यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
च्निवडीवर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी त्यांच्या कोसला (१९६३), हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११) या ग्रंथांची चिकित्साही करण्यात आाली.
च्नेमाडे यांना टीकास्वयंवर या समीक्षा लेखनाबद्दल १९९०मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. तर ‘पद्मश्री’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मराठीतील ज्ञानपीठ
१९७४
वि.स. खांडेकर
१९८७
वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज
२००३
गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर
संपूर्ण आयुष्य मराठी भाषेसाठी वेचल्यानंतर मिळालेला हा गौरव आमच्यासाठी खूप मोठा आहे. त्याचे मूल्यमापन होऊच शकत नाही. साऱ्यांचे फक्त आभार तेवढे मानायचे आहेत.
- प्रतिभा भालचंद्र नेमाडे
नेमाडेंना ’घुमान’साठी पायघड्या
च्साहित्य संमेलन म्हणजे ‘रिकामटेकड्यांंचा उद्योग, असे विधान करून साहित्य वर्तुळात खळबळ उडवून दिल्यानंतर टिकेचे धनी ठरलेले नेमाडे यांना आता संमेलनाला येण्यासाठी पायघड्या घातल्या जाणार आहेत.
च्डॉ. नेमाडे यांना आमंत्रण देण्याचे संमेलन समितीने निश्चित केले आहे. संमेलनाच्या व्यासपीठावर बसवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांनी या व्यासपीठावर मुक्त चिंतन करावे आणि वादाची परिणिती संवादामध्ये व्हावी, हा त्यामागील हेतू असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला आणि महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.