कोपरखैरणे टपाल कार्यालयाचा कोंडवाडा
By Admin | Updated: July 20, 2016 02:24 IST2016-07-20T02:24:48+5:302016-07-20T02:24:48+5:30
खासदारांच्या पाहणी दौऱ्यानंतर कोपरखैरणेतील पोस्ट कार्यालय कँटीनच्या जागेत हलवण्यात आले आहे.

कोपरखैरणे टपाल कार्यालयाचा कोंडवाडा
सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- खासदारांच्या पाहणी दौऱ्यानंतर कोपरखैरणेतील पोस्ट कार्यालय कँटीनच्या जागेत हलवण्यात आले आहे. यामुळे पोस्टाचे दैनंदिन कामकाज भर पावसात उघड्यावर पडले आहे, तर पुरेशा जागेअभावी नागरिकांचे महत्त्वाचे दस्तऐवज असुरक्षितरीत्या पडून आहेत.
आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचा अनुभव सध्या कोपरखैरणे पोस्टाचे कर्मचारी अनुभवत आहेत. जुलै महिन्याच्या सुरवातीला कोपरखैरणे सेक्टर ७ येथील पोस्ट कार्यालयात छताचे प्लास्टर कोसळले होते. वृत्तपत्रांद्वारे याची माहिती मिळताच खासदार राजन विचारे यांनी सदर पोस्ट कार्यालयाला भेट देवुन पाहणी केली होती. यावेळी सिडको व पोस्टाचे अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. पोस्टाचे कर्मचारी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये काम करत असल्याचे नजरेस पडताच विचारे यांनी त्याठिकाणी डागडुजी करण्याचे सिडकोला निर्देश दिले. तसेच डागडुजीच्या कामाला तत्काळ सुरवात करण्याकरिता पोस्टाला पर्यायी जागा देण्याचेही त्यांनी सुचवले. परंतु सिडको पोस्टाची पर्यायी सोय करत असून ती जागा कार्यालयासाठी योग्य नसल्याचे पोस्ट कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांचे म्हणणे न ऐकताच सिडकोच्या सोयीनुसार निर्देश देवून खासदार मोकळे झाले होते. सिडकोनेही संधी साधत अवघ्या तीनच दिवसात पोस्टाचे कार्यालय एनएमएमटी डेपोच्या कँटीनमध्ये हलवले आहे. खासदारांच्या या घाईमुळे पोस्टाचे संपूर्ण कामकाज उघड्यावर पडले आहे. पोस्टमन व अधिकारी अशा सुमारे २० कर्मचाऱ्यांसाठी छोट्याशा कँटीनची जागा अपुरी पडत आहे, तर रोजचे टपाल ठेवायला देखील त्याठिकाणी जागा नाही. वाटप करण्यापूर्वी पत्रांची अथवा बिलांची मांडणी करण्यासाठी देखील जागा नसल्यामुळे उघड्यावर बसून पोस्टमन कामे करत आहेत.
जेमतेम पाच ते सहा टेबल असल्यामुळे एकाचे काम झाले की दुसऱ्याला त्याठिकाणी काम करण्याची संधी मिळत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ जात असून त्यांच्या पुढील कामकाजावर परिणाम होत आहे. या प्रकारात नागरिकांपर्यंत टपाल पोचण्यासही विलंब होत आहे. या त्रासात पुरुषांसह महिला कर्मचारी देखील भरडल्या जात आहेत.