कोकण रेल्वे : प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक
By Admin | Updated: October 8, 2014 23:02 IST2014-10-08T22:21:38+5:302014-10-08T23:02:54+5:30
स्थानकप्रमुखांना घेराव-तब्बल ३२ तासानंतर कोकण रेल्वे मार्ग सुरु

कोकण रेल्वे : प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक
रत्नागिरी : कोकण रेल्वेची सेवा ठप्प झालेली असताना दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने रत्नागिरीत बारा तास खोळंबलेल्या सावंतवाडी-दादर या रेल्वेतील प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकप्रमुखांना घेराव घालून एकच हंगामा केला. चिपळूणनजीक मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मंगळवारी सकाळपासून ठप्प आहे. मंगळवारी दिवसभरातील रेल्वे रद्द करण्यात आल्या किंवा त्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या. मंगळवारी रात्री सावंतवाडी-दादर ही रेल्वे रत्नागिरीत पाऊण वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. ही रेल्वे कणकवलीपासूनच उशिराने पुढे सरकत होती. एव्हाना चिपळूणला मालगाडीचे डबे घसरल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे ही रेल्वे मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत दाखल झाली. मात्र रात्री या रेल्वेतील वीजच गायब झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. वीज नसल्याने उष्णतेने हैराण झालेल्या अनेक प्रवाशांनी रेल्वेबाहेर येऊन रेल्वे स्थानकाचाच आसरा घेतला. काही वेळाने तर रेल्वेतील पाणीही संपले. त्यामुळे प्रवाशांची गोची झाली. याबाबत मध्यरात्रीच या प्रवाशांनी आपल्या व्यथा रेल्वे प्रशासनाकडे मांडल्या. मात्र त्यानंतर केवळ समजूत काढण्यापलिकडे प्रशासनाने काहीच केले नाही.
बुधवारची सकाळ झाली, त्यानंतर पुन्हा या प्रवाशांनी रेल्वेच्या स्थानकप्रमुखांचे केबिन गाठले आणि त्यांना जाब विचारल्या. महिलांनीही आक्रमक होत स्थानकप्रमुखांना जाब विचारला. त्यावेळी संतप्त प्रवाशांची पुन्हा एकदा समजूत काढून स्थानकप्रमुखांनी सकाळी ११ वाजेपर्यंत रेल्वे सोडण्यात येईल, तोपर्यंत ट्रॅकचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
रेल्वे लवकरच सोडण्यात येईल, असे आश्वासन देऊन संबंधित स्थानकप्रमुखांनी आपली सोडवणूक करून घेतली. मात्र सकाळचे ११ वाजले तरीही रेल्वे सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी आणखीनच संतप्त झाले. त्यातच हजारोंच्या संख्येने असलेले प्रवासी पाहून व्यापाऱ्यांनीही आपल्या पदार्थांचे दर वाढवले. स्थानकावर केळी तर हंगाम नसतानाही ५० रूपये डझन या दराने विकली जात होती. त्यामुळे या प्रवाशांनी आपले पैसे परत करावेत, अशी मागणी केली. मात्र त्यावर रेल्वे अधिकारी निरूत्तर झाले.
अखेरीस दुपारी ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाली आणि प्रवाशांनी निश्वास टाकला. सावंतवाडी ते रत्नागिरी यापलिकडे जाण्यास रेल्वेला १५ तास लागले. (प्रतिनिधी)
प्रवासी वैतागले!
चिपळूणनजीक मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मंगळवारी सकाळपासून ठप्प.
मंगळवारी रात्री सावंतवाडी-दादर ही रेल्वे रत्नागिरीत पाऊण वाजण्याच्या सुमारास दाखल.
रत्नागिरीत आल्यानंतर रेल्वेतील वीजच गायब
थोड्यावेळाने रेल्वेतील पाणीही संपल्याने प्रवाशांचे हाल.
अनेक प्रवाशांनी रेल्वेबाहेर येऊन रेल्वे स्थानकाचाच घेतला आसरा.
थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रशासनाचा खटाटोप.
संतप्त प्रवाशांनी केली पैसे परत देण्याची मागणी.
हजारो प्रवाशांना महाग पदार्थांचाही बसला फटका.
तब्बल ३२ तासानंतर कोकण रेल्वे मार्ग सुरु
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणजवळील खेर्डी माळेवाडी येथे रुळ तुटल्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मालगाडीला अपघात झाला होता. ३२ तासानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असून या मार्गावरुन मुंबई मेंगलोर एक्स्प्रेस प्रथम धावली.
कोकण रेल्वे मार्गावर रुळ तुटल्याने ११ डबे घसरले होते. रुळ उखडले होते. डब्यांची चाके निखळली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या अपघातानंतर कोकण रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हा मार्ग लवकर सुरु होईल की नाही अशी शंका होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने १५० कामगारांच्या मदतीने व क्रेनच्या सहाय्याने हे काम अल्प कालावधीत पूर्ण केले. त्यामुळे अखेरीस रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. तब्बल ३२ तासानंतर कोकण रेल्वेची ही सेवा सुरळीत सुरू झाली.
रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या मार्गावर सायंकाळी ४ नंतर मुंबई मेंगलोर गाडी धावली. त्या पाठोपाठ राज्यराणी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, कोकणकन्या, जनशताब्दी या गाड्यांची ये-जा सुरु झाली आहे. या मार्गावरील संकट टळल्याने रेल्वे प्रवाशांना व रेल्वे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र आज बुधवारी सकाळी चिपळूण रेल्वेस्थानकात मुंबईहून आलेल्या मेंगलोर एक्स्पे्रसमधील प्रवाशांना सायंकाळपर्यंत ताटकळत रहावे लागले. या गाडीत पॅन्ट्रीकारची सोय नसल्याने वृद्ध, लहान मुले यांचे हाल झाले. (प्रतिनिधी)