कोकण रेल्वेला आले ‘अच्छे दिन’

By Admin | Updated: February 20, 2015 23:11 IST2015-02-20T22:29:42+5:302015-02-20T23:11:40+5:30

रौप्य महोत्सव : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे मंत्रीपदामुळे अनेक समस्या लागणार मार्गी

Konkan Railway 'Good Day' | कोकण रेल्वेला आले ‘अच्छे दिन’

कोकण रेल्वेला आले ‘अच्छे दिन’

प्रकाश वराडकर - रत्नागिरी --कोकण रेल्वे प्रकल्पाला २५ वर्षे पूर्ण होत असताना केंद्रातील मोदी सरकारमध्ये रेल्वेमंत्री असलेले सुरेश प्रभू यांच्या मंत्रीपदाच्या रुपाने कोकण रेल्वेला ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्याचबरोबर कोकण रेल्वेतील कोकणचेही भाग्य उजळले आहे. प्रभू यांच्या निर्णयांनुसार कोकण रेल्वेत कोकणवासियांना अभिप्रेत असलेले बदल, सुविधा हळूहळू प्रस्तावाच्या रुपाने पुढे सरकू लागल्याने समाधानाचे वातावरण आहे. कोकण रेल्वेच्या विकासाबाबत प्रभू यांनी भरीव कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोकणवासीयांना प्रभू यांच्या रुपाने आपले खंबीर, अभ्यासू नेतृत्त्व संसदेत गेल्याचा आनंद तर झालाच, परंतु कोकण रेल्वेला प्रा. दंडवतेंनंतर पुन्हा एकदा न्याय मिळेल, याबाबत आशाही पल्लवीत झाल्या. नाव कोकण रेल्वे परंतु कोकणच्या हाती काही ठराविक रेल्वे गाड्या वगळता धुपाटणेच, अशी स्थिती गेल्या काही वर्षात निर्माण झाली होती. कोकण रेल्वे प्रकल्पाचे ५१ टक्के भागभांडवल हे केंद्र शासनाकडे आहे. उर्वरित ४९ टक्के भागभांडवलात महाराष्ट्राचा सर्वाधिक २२ टक्के हिस्सा आहे. त्यानंतर कर्नाटक राज्याचा १५ टक्के तर गोवा आणि केरळचा प्रत्येकी ६ टक्के हिस्सा आहे. असे असतानाही महाराष्ट्राच्या ज्या कोकण भागातून रेल्वे जाते तेथील प्रवाशांकडे, उद्योगांकडे दुर्लक्षाचे धोरण अवलंबले गेले. दक्षिणेकडील राज्यांनाच कोकण रेल्वेचा अधिक लाभ होतोय, अशी भावना निर्माण झाली व त्यात तथ्यही होते. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या मर्यादित आहेत. कोकण रेल्वेत निर्णय क्षमता असलेले अधिकारीही राज्याबाहेरीलच होते. या स्थितीत कोकणला कोणी वाली राहिला नव्हता. या स्थितीतही कॉँग्रेस नेते नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांनी सावंतवाडी-दादर राज्यराणी ही गाडी भांडून कोकणसाठी मिळवली. आता कोकणातीलच सुरेश प्रभू हे केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री आहेत. प्रभू यांनी कर्तव्यभावना ओळखून कोकण रेल्वेत अनेक सुधारणा सुरू केल्या आहेत. ज्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. कोकण रेल्वेमार्गावर सावंतवाडी-दिवा पॅसेंजर व रत्नागिरी-दादर पॅसेंजर या दोनच गाड्या कोकणसाठी देण्यात आल्या. या मार्गावरून मुंबईला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही प्रवासी गाड्यांची पूर्तता झाली नाही. रत्नागिरीतून आणखी एक तर चिपळुणहून एक अशा दोन प्रवासी गाड्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. प्रभू यांच्या सुचनेनुसार येत्या काही महिन्यांत या गाड्या सुरू होण्याचे संकेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल यांनी दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दिली आहे. अनेक सुविधा याआधी निर्माण करता येणाऱ्या होत्या, परंतु कोकणला काही द्यावे, ही मानसिकताच अधिकारी व रेल्वे खात्याचे मंत्री यांच्यात नव्हती. आता रेल्वे मंत्रीच कोकणचे आहेत. त्यामुळे सुधारणांसाठी वार्षिक मर्यादा बदलून प्रभू यांनी ती ४० कोटींवर नेऊन ठेवली आहे. रेल्वेस्थानकावर केवळ दाक्षिणात्य खाद्य दिसायचे, आता कोकणातील उत्पादनांचे स्टॉल्सही सुरू झाले आहेत. तिकिट बुकिंग सोईस्कर होण्याकरिता आरक्षण केंद्रांची संख्याही वाढणार आहे. चिपळूण-कऱ्हाड, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग उभारण्याचा प्रस्तावही असून, त्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वेने जोडले जाणार आहे. व्यापार उदिमातही वाढ होणार आहे.


-आशावादी...दंडवते, सिंग, फर्नांडीस त्रयींमुळे रुळावर
बॅ. नाथ पै यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तत्कालिन राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या प्रा. मधू दंडवते कोकणवासियांना स्वप्नवत वाटत असलेला कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात यावा, म्हणून जोरदार पाठपुरावा केला. त्यावेळी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या प्रा. दंडवते यांनी सिंग व तत्कालिन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या पाठबळावर हा प्रकल्प मंजूर करून घेत त्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले. त्यानंतर कर्जरोखे उभारून व केंद्र सरकारची मदत घेत या प्रकल्पाचे काम आठ वर्षांच्या काळात पूर्ण करण्यात आले. २६ जानेवारी १९९८ रोजी पूर्ण झालेला कोकण रेल्वे प्रकल्प १ मे १९९८ रोजी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला अर्पण केला.

नव्याने होणाऱ्या सुधारणा...
प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळणार.
डिंगणी-जयगड मालवाहतूक मार्ग प्रकल्पाला मंजुरी.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार.
कोकण रेल्वे विजेवर चालविण्यासाठी यंत्रणा उभारणार.
सर्व रेल्वे स्थानकांवरील अपूर्ण निवारा शेड्स पूर्ण होणार.
प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार, निवारा हट्स उभारणार.
एक हजार किलोवॅटचा सोलर एनर्जी प्रोजेक्ट उभारणार.
१३ मीटर्सऐवजी आता कोकण रेल्वेला मिळणार २६० मीटर्सचे रेल्वे रूळ.

Web Title: Konkan Railway 'Good Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.