विस्कळीत कोकण रेल्वेला ‘लाखमोलाचा’ प्रतिसाद
By Admin | Updated: September 10, 2014 03:20 IST2014-09-10T03:20:26+5:302014-09-10T03:20:26+5:30
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष ट्रेन मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या

विस्कळीत कोकण रेल्वेला ‘लाखमोलाचा’ प्रतिसाद
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष ट्रेन मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या. मात्र ऐन गणेशोत्सवात मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे विस्कळीत झाली आणि त्याचा मोठा फटका कोकणवासियांना बसला. विस्कळीत होऊनही चाकरमान्यांनी विशेष ट्रेनला चांगला प्रतिसाद दिला. तब्बल १ लाख २१ हजार १८ प्रवाशांनी विशेष ट्रेनमधून प्रवास केल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित ट्रेनबरोबरच विशेष ट्रेनची घोषणा मध्य, कोकण आणि पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली. एकूण २१४ विशेष गाड्या घोषित करतानाच यात १३0 ट्रेन आरक्षित, ४६ प्रीमियम आरक्षित आणि ३८ अनारक्षित ट्रेनचा समावेश होता. मात्र या गाड्या जरी चाकरमान्यांसाठी सोडण्यात आल्या तरी विस्कळीत झालेल्या कोकण सेवेमुळे त्याचा फारसा फायदा प्रवासी उचलतील असे वाटत नव्हते. २४ आॅगस्ट रोजी वीर ते करंजाडी दरम्यान मालगाडीचे डबे घसरले आणि या मार्गावरून जणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठा फटका बसला. तब्बल दोन आठवडे कोकण रेल्वेमार्गावरील सेवा विस्कळीत राहिली. पहिले आठ ते दहा दिवस ट्रेन सात ते दहा तास उशिरानेच धावल्या, तर काही ट्रेन रद्दच करण्यात आल्या. त्यानंतर ट्रेन थोड्याफार फरकानेच उशिराने धावत होत्या. असे असतानाही कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांनी ट्रेनला पसंती दिली. २१४ पैकी १७२ विशेष ट्रेनमधून १ लाख २१ हजार १८ प्रवाशांनी प्रवास केल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. २६ आॅगस्टपासून ते ८ सप्टेंबरपर्यंत चाकरमान्यांनी केलेल्या प्रवासात हा प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवानिमित्त असलेल्या उर्वरित विशेष गाड्या अजूनही धावणार आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)