कोकण रेल्वे २६ तासांनी रुळावर
By Admin | Updated: August 26, 2014 04:00 IST2014-08-26T04:00:54+5:302014-08-26T04:00:54+5:30
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सोमवारी ‘रुळावर’ आली.

कोकण रेल्वे २६ तासांनी रुळावर
रत्नागिरी / महाड : अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सोमवारी ‘रुळावर’ आली. तब्बल २६ तासांनंतर हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला असला तरी वेळापत्रकात सुसूत्रपणा येण्यासाठी आठ गाड्या रद्द करण्यात आल्या. तरीही सोमवारी अनेक गाड्या उशिराने धावत होत्या.
रविवारी खेड तालुक्यातील वीर ते करंजाडीदरम्यान रेल्वेरूळ तुटल्याने मालवाहतुकीचे आठ डबे रुळांवरून घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मात्र, मोठ्या प्रमाणावर कोकणाकडे आलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीच्या मदतीने अलीकडे-पलीकडे प्रवाशांना सोडून त्या त्या स्थानकात उभ्या असलेल्या गाड्या परतीच्या मार्गावर वळविण्यात आल्या, तरीही हजारो प्रवाशांचे हाल झाले.
सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मत्स्यगंधा एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली. वाहतूक सुरू झाली असली तरी वेळापत्रक कोलमडलेलेच होते़ सावंतवाडी - दादर गणपती स्पेशल ही गाडी तीन तास २० मिनिटे उशिराने धावत होती. अन्य रेल्वे गाड्यांचीही स्थिती काही फरकाने अशीच होती़ (प्रतिनिधी)