सलग चौथ्यावेळीही राज्यात अव्वल ठरणार ‘कोकण पॅटर्न’?
By Admin | Updated: June 8, 2015 00:50 IST2015-06-07T23:58:16+5:302015-06-08T00:50:48+5:30
कोकण विभागीय मंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यात राबवण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता विकास कार्यक्रम यामुळे कोकण विभाग राज्यात अव्वल आहे,

सलग चौथ्यावेळीही राज्यात अव्वल ठरणार ‘कोकण पॅटर्न’?
सागर पाटील -टेंभ्ये -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या (सोमवार) दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर होणार आहे. गेली सलग तीन वर्षे कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. चौथ्या वर्षीदेखील कोकण विभाग राज्यात अव्वल असेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. तसे झाल्यास राज्यात कोकण पॅटर्न आपला वेगळा ठसा निर्माण करणार आहे. सलग चार वर्षे राज्यात प्रथम येण्याचा बहुमान केवळ कोकण विभागीय मंडळाच्या नावे नोंद होईल, असा विश्वास कोकणवासीयांच्यावतीने व्यक्त केला जात आहे.
कोकण विभागीय मंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यात राबवण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता विकास कार्यक्रम यामुळे कोकण विभाग राज्यात अव्वल आहे, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. यापूर्वी राज्यामध्ये लातूर पॅटर्न सुपरिचित होता. परंतु सलग तीन वर्षे राज्यात प्रथम येण्याची हॅट्ट्रिक साधून कोकणाने आपले वेगळेपण जपले आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय शिस्त, शिक्षकांकडून केले जाणारे अथक प्रयत्न, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच गेली तीन वर्षे कोकण विभागीय मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.
यावर्षी कोकण विभागीय मंडळांतर्गत ४१,५५५ विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २७,९७७, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३,५७८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून १०३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. सोमवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर होणार आहे. आता प्रतीक्षा आहे ती कोकणच अव्वल ठरणार का याची..!
कोकण विभागीय मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असणारी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. राज्यातील अन्य विभागीय मंडळाच्या तुलनेत कोकणातील विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहणारे आहेत. यामुळे निकालाची टक्केवारी वाढण्यास मदत होते.
- आर. बी. गिरी, -प्रभारी अध्यक्ष, कोकण बोर्ड
कोकण विभागीय मंडळाने आपले स्वतंत्र अस्तित्व राज्यामध्ये निर्माण केले आहे. यामुळे राज्यात वैशिष्ट्यपूर्ण असा कोकण पॅटर्न निर्माण झाला आहे. शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये दिसून येणारी शिस्त राज्यात अन्यत्र पाहायला मिळत नाही. यामुळेच कोकण विभाग राज्यात गेली ३ वर्षे अव्वल आहे. पालकांची विद्यार्थ्याला शिकवण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
- किरण लोहार, सहसचिव, कोकण विभाग.
कोकण विभागाने राज्यात स्वतंत्र कोकण पॅटर्न निर्माण करण्यामागे खऱ्या अर्थाने सर्व शालेय घटकांची मेहनत महत्त्वाची आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे गुणवत्ता वाढीस मदत मिळत असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केले.