कोल्हापूरची केळी जम्मू-काश्मीरला
By Admin | Updated: December 26, 2014 00:04 IST2014-12-25T23:44:28+5:302014-12-26T00:04:17+5:30
तमदलगेच्या संस्थेचा पुढाकार : बाजारभावापेक्षा १० ते १५ टक्के जादा दराने खरेदी

कोल्हापूरची केळी जम्मू-काश्मीरला
जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल, शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील केळी तमदलगे (ता. शिरोळ) येथील संजीवनी अॅग्रो फळे व फुले खरेदी-विक्री संघाच्यावतीने जम्मू-काश्मीरला पाठविण्यात येत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना संघाच्यावतीने लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन करून केळी लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.महाराष्ट्र शासन कृषी पणन विभाग यांच्या सहकार्याने व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तमदलगे येथील संजीवनी अॅग्रो फळे व फुले खरेदी विक्री संघाच्यावतीने हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना केळी लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन जास्तीतजास्त उत्पादन काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. उत्पादित झालेली केळी बाजारभावापेक्षा १० ते १५ टक्के जादा दराने खरेदी करून इतर राज्यांमध्ये पाठविण्यात येतात.
शाहूवाडी तालुक्यातील जगन्नाथ हिरूगडे यांच्या दीड एकर शेतामध्ये केळी लागवड करून आतापर्यंत ३१ टन केळी दुसऱ्या राज्यामध्ये पाठविण्यात आली आहे.
प्रतिटन ११ हजार रुपये दराप्रमाणे संघाच्यावतीने खरेदी करून केळी लागवडीला प्रोत्साहन देण्याचे काम कंपनीचे सल्लागार सागर कोपार्डेकर, अध्यक्ष चेतन पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाबा आडमुठे हे करीत आहेत. नुकतेच कृषी विभागाचे तंत्र सहायक दिलीप दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केळी पाठविण्यात आली.
यावेळी दिलीप सबनीस, नामदेव खोत, प्रमोद चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)