कोल्हापुरी मसाल्यास मिळणार ‘मानांकन’

By Admin | Updated: June 24, 2015 00:45 IST2015-06-23T23:42:51+5:302015-06-24T00:45:52+5:30

केंद्राची तत्त्वत: मान्यता : चप्पल, गुळाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात

Kolhapuri mash will get 'rating' | कोल्हापुरी मसाल्यास मिळणार ‘मानांकन’

कोल्हापुरी मसाल्यास मिळणार ‘मानांकन’

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -येथील करवीर आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे तयार केला जाणाऱ्या पांढऱ्या, तांबड्या रश्श्यासाठीच्या मसाल्यास भौगोलिक उपदर्शन मानांकन देण्यास केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. लवकरच याची घोषणा केली जाणार आहे. मानांकन मिळाल्यास कोल्हापुरी मसाल्याची ओळख देशात आणि विदेशांतही होणार आहे. मानांकनासाठी मसाल्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने (आत्मा) कोल्हापुरी गूळ, चप्पल यांचाही प्रस्ताव पाठविला आहे. पहिल्या टप्प्यात मसाल्यास आणि नंतर चप्पल, गूळ यांना मानांकन मिळणार आहे.
कृषी विभागाने वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांमुळे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आजरा घनसाळला प्रमुख कृषी व फलोत्पादन पिकांचे भौगोलिक उपप्रदर्शन मानांकन दिले आहे. यापाठोपाठ कोल्हापुरी मसाल्यालाही हेच मानांकन मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी जिल्ह्यातून गुणवत्तेच्या निकषांवर निवडून आजरा घनसाळ, कोल्हापुरी मसाला, गूळ, चप्पल यांचे मानांकनासाठीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले होते. आजरा घनसाळनंतर मसाल्यास मानांकन देण्याला केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती ‘आत्मा’ प्रशासनाकडे आली आहे.
करवीर आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्था २००४ पासून पापड आणि पांढरा आणि तांबड्या रश्श्यासाठी लागणारा मसाला तयार करते. कोल्हापूर, पुणे, मुंबई येथून या मसाल्यास प्रत्येक वर्षी मागणी वाढते आहे. सर्वसाधारणपणे वर्षाला दीड हजार किलो मसाला तयार केला जातो. ३६ प्रकारांच्या पदार्थांपासून मसाला तयार केल्यामुळे खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे. कोल्हापूरला आलेल्या पर्यटकांना तांबडा, पांढऱ्या रश्श्याची चव चाखण्याकडे आकर्षित करण्यात या मसाल्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच मानांकनासाठी निवड केली आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत व त्याला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. दरम्यान, या मसाल्याला मानांकन मिळाल्यास तो देशात व परदेशांत पोहोचणार आहे. मसाल्यास मानांकन मिळावे, यासाठी ‘आत्मा’चे प्रशासन पाठपुरावा करीत आहे.

तांबड्या आणि पांढऱ्या रश्श्यासाठीच्या कोल्हापुरी मसाल्याला मानांकन मिळावे यासाठी केंद्र शासनाची तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. काही दिवसांत ती जाहीर होईल. मानांकन मिळणारा मसाला करवीर आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे तयार केला जातो. आजरा घनसाळनंतर मसाल्यास मानांकन मिळाल्यास कोल्हापूरची ख्याती देश-विदेशांत पोहोचणार आहे.
- बसवराज मास्तोळी, प्रकल्प संचालक, आत्मा

Web Title: Kolhapuri mash will get 'rating'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.