कोल्हापुरात महिलांची टोलवर तडी
By Admin | Updated: November 21, 2014 02:22 IST2014-11-21T02:22:40+5:302014-11-21T02:22:40+5:30
टोल देण्यास नकार देऊन पर्यायी मार्गाने जाणाऱ्या ट्रकचालकास टोल कर्मचाऱ्यांनी बुधवारी केलेल्या मारहाणीचे

कोल्हापुरात महिलांची टोलवर तडी
कोल्हापूर : टोल देण्यास नकार देऊन पर्यायी मार्गाने जाणाऱ्या ट्रकचालकास टोल कर्मचाऱ्यांनी बुधवारी केलेल्या मारहाणीचे पडसाद गुरुवारी सकाळी कळंबा टोलनाक्यावर उमटले. टोलविरोधी कृती समितीतील महिलांनी रुद्रावतार धारण करत नाक्यावरील कर्मचाऱ्यांना चोप दिला आणि प्लॅस्टिकचे बॅरिकेट्सही फेकून दिले. या प्रकारामुळे कर्मचारी तेथून पसार झाले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग होऊन टोलवसुली बंद झाली.
‘कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती’ने नितीन राजाराम चव्हाण (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) या ट्रकचालकाला मारहाण करणाऱ्या संशयितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद ढोमे यांच्याजवळ केली. आणि चव्हाण यांच्यासह सर्व जण पोलीस ठाण्यात पुन्हा फिर्याद देण्यासाठी गेले. त्यानंतर वातावरण निवळले.
बुधवारी दुपारी ट्रकचालक नितीन चव्हाण टोलनाक्यावरून जात होता. त्याने टोल देण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला पर्यायी मार्गाने जाण्यास सांगितले. या वेळी ट्रकचालक व कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. यामधून त्यांनी चव्हाणला मारहाण केली.