कोल्हापूर टोलमुक्त करणारच
By Admin | Updated: November 22, 2014 03:09 IST2014-11-22T03:09:17+5:302014-11-22T03:09:17+5:30
टोलसह एलबीटीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आम्ही टोलमुक्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशी आम्ही निश्चित बांधील आहोत.

कोल्हापूर टोलमुक्त करणारच
कोल्हापूर : टोलसह एलबीटीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आम्ही टोलमुक्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशी आम्ही निश्चित बांधील आहोत. थोडा वेळ द्या, कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोल्हापूर टोलमुक्त करणारच, अशी ग्वाही सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिली. तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गुरुवारी येथील टोलनाक्यावर महिलांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर टोल या विषयात सरकारने माघार घेतलेली नाही. सायन-पनवेल येथील २ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पातील टोल आकारणी रद्द करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. त्या तुलनेत कोल्हापूर प्रकल्पाचा प्रश्न छोटा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन टोल रद्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या सरकारची स्थिती थोडी अस्थिर आहे. दररोज सरकारकडून घेतले जात असलेले तातडीचे निर्णय आणि सरकार स्थिर करण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे सरकारची धावपळ होत आहे. तरीही यासंदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासोबत दोनदा बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली आहे. परंतु पाच वर्षांत सुटू शकला नाही तो प्रश्न एकाच रात्रीत कसा सुटू शकेल? यासाठी वेळ लागणार आहे. एलबीटीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. जीएसटी आल्यावर आम्ही एलबीटी आणि जकात पूर्ण संपवू. व्यापाऱ्यांनी हा कर व्हॅटवर सरचार्ज आकारण्याचा पर्याय दिला आहे. त्यानुसार हा कर व्हॅटमध्ये जोडता येईल का, याबाबत सरकार विचार करीत आहे. एलबीटी कमी जमा झाला तर अडचण होईल, तसेच त्याला पर्यायही दिला नाहीतर तेही चालू शकणार नाही. (प्रतिनिधी)