कोल्हापूर : अंबाबाईचा आजपासून जागर

By Admin | Updated: September 24, 2014 22:53 IST2014-09-24T22:52:32+5:302014-09-24T22:53:46+5:30

पूर्वसंध्येला मंदिर गजबजले : शारदीय नवरात्रौत्सवाची धूम..

Kolhapur: From today on Ambabai Jagar | कोल्हापूर : अंबाबाईचा आजपासून जागर

कोल्हापूर : अंबाबाईचा आजपासून जागर

कोल्हापूर : असुरांचा संहार करून प्रजेला सुख, समृद्धी देणाऱ्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला उद्या, गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रासह देशभरातील आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. उत्सवाच्या नियोजनानुसार उद्या, गुरुवारी सकाळी घटस्थापना होईल. तोफेच्या सलामीनंतर देवीचा अभिषेक, आरती, दुपारची आरती हे विधी पूर्ण झाल्यानंतर देवीची बैठी सालंकृत पूजा बांधली जाईल.
नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला अंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले. भाविकांच्या उत्साही गर्दीत मंगलमय वातावरणाची अनुभूती येत आहे. आज जोहान्सबर्गस्थित युगंधर राव यांनी अंबाबाईला २७ किलो चांदीचे वाहन (आसन) अर्पण केले. कोल्हापूर विधानसभेसाठी आलेले निवडणूक खर्च निरीक्षक नवराजसिंग पंगटी यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. उद्यापासून सुरू होणाऱ्या या उत्सवासाठी श्रीपूजक सर्व धार्मिक विधींच्या तयारीला लागले आहेत. देवस्थान समितीच्या कार्यालयात नियोजनाची लगबग सुरू आहे, तर पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईची पॉप्युलर स्टील ४० फूट उंचीची मूर्ती उभारत आहे. श्रीपूजक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा, पोलीस प्रशासन यांनी जबाबदाऱ्यांनुसार तयारी केली आहे. भाविकांसाठी पूर्व दरवाजा, भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड, येथे मंडप असून रांगेतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे.

अंबाबाईला तब्बल २७ किलोचांदीचे वाहन अर्पण
करवीरनिवासिनी अंबाबाईला आज, बुधवारी सायंकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गस्थित युगंधर राव यांनी चांदीचे वाहन (आसन) अर्पण केले. कोल्हापुरातील सुवर्ण कारागीर श्रीकांत माने यांनी तब्बल २७ किलो चांदीपासून बनविलेल्या या वाहनाचे मूल्य १५ लाख रुपये आहे. मूळचे हैदराबादचे युगंधर व राधा राव हे दाम्पत्य तसेच सिंगापूर येथील मुलगी सिंदुरा आणि मुलगा कल्याण हे अमेरिकेतून या सोहळ्यासाठी आले होते. राव हे जनरल इन्श्युरन्स कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर आहेत. पुणे क्षेत्रीय कार्यालयात असताना त्यांना देवीसाठी वस्तू अर्पण करायची होती. त्यानुसार त्यांनी समितीशी संपर्क साधला होती. यावेळी समितीचे सचिव संजय पवार, सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, सहसचिव संजय साळवी उपस्थित होते.

ज्योत नेण्यासाठी मंडळांची गर्दी..
शक्तिपीठ असलेल्या मंदिरातून देवीची ज्योत नेण्याची पद्धत आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, माळशिरस, सांगोला, सोलापूर, कोकण येथील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देवीची ज्योत नेण्यासाठी मंदिरात गर्दी केली. ‘उदे गं अंबे उदे,आई राजा उदे उदे’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात ज्योत घेऊन तरुण रवाना होत होते.

डोअर मेटल डिटेक्टर वाढविले...
देवस्थान समितीने आज वाढीव पाच डोअर मेटल डिटेक्टर आणले. अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाजांवरील डोअर मेटल डिटेक्टरला लागूनच हे डिटेक्टर जोडण्यात येत आहेत. त्यामुळे भाविकांना दोन डोअर मेटल डिटेक्टर व सुरक्षा रक्षकांकडील हँडमेटल डिटेक्टरच्या तपासणीतून दर्शनासाठी जावे लागेल.


शारदीय नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला (बुधवारी) करवीरनिवासिनी अंबाबाईची खडी पूजा बांधण्यात आली होती.
दुसऱ्या छायाचित्रात देवीची ज्योत नेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यांतून मंडळांचे आलेले कार्यकर्ते. अंबा माता की जय’, ‘उदे गं आई उदे’, ‘आई राजा उदे उदे’च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात ही ज्योत ते गावी नेत होते.

Web Title: Kolhapur: From today on Ambabai Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.