कोल्हापुरात प्रचाराची रणधुमाळी थंडावली
By Admin | Updated: October 31, 2015 02:25 IST2015-10-31T02:25:31+5:302015-10-31T02:25:31+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी थंडावली. प्रचारफेऱ्यांतून प्रत्येक उमेदवाराने शक्तिप्रदर्शन केल्याने प्रत्येक प्रभागातील

कोल्हापुरात प्रचाराची रणधुमाळी थंडावली
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी थंडावली. प्रचारफेऱ्यांतून प्रत्येक उमेदवाराने शक्तिप्रदर्शन केल्याने प्रत्येक प्रभागातील गल्ली-बोळ पारंपरिक वाद्यांनी, फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून गेले. आता प्रभागात छुप्या प्रचाराला गती आली आहे.
येत्या रविवारी मतदान होणार असून सोमवारी मतमोजणी आहे. या निवडणुकीसाठी ८१ प्रभागांतून ५०६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये राजकीय पक्षांतर्फे एकूण ३६७ उमेदवार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा-ताराराणी महायुती, शिवसेना आदी पक्ष-आघाड्यांनी आपले उमेदवार निवडणुकीत पक्षीय पातळीवर उभे केले आहेत.
मुखवट्याचीही क्रेझ
प्रभागातील आपला उमेदवार हा एकटा नसून तो प्रभागाचा चेहरा आहे, हे दर्शविणारा प्रसंगही यंदा नव्याने निवडणुकीच्या प्रचारात दिसून आला. प्रचारफेरीमध्ये लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत अनेकांनी आपल्या उमेदवाराचा फोटो असणारा कागदी मुखवटा आपल्या चेहऱ्यावर लावून ‘आम्ही सर्व एकच’ असल्याचे दाखवून दिले.
हलगी...रांगोळ्या...
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हलगीच्या कडाडणाऱ्या ठेक्यामुळे व ढोल-ताशांमुळे प्रभागात प्रचारफेऱ्या आल्याची जाणीव होत होती. प्रचारफेरी जाणारे मार्ग समर्थकांनी पक्षाच्या चिन्हांच्या रांगोळ्यांनी सजविले होते. हलगीच्या ठेक्यावर प्रचारफेऱ्या पुढे सरकत होत्या.