कोकण उपायुक्तांकडे ११ कोटींचे घबाड
By Admin | Updated: May 24, 2014 02:36 IST2014-05-24T02:36:35+5:302014-05-24T02:36:35+5:30
कोकण आयुक्तालयामध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या भाऊसाहेब पाटील यांच्याकडे ११ कोटी ३४ लाख ६८ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे

कोकण उपायुक्तांकडे ११ कोटींचे घबाड
नवी मुंबई : कोकण आयुक्तालयामध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या भाऊसाहेब पाटील यांच्याकडे ११ कोटी ३४ लाख ६८ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणी लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले भाऊसाहेब पाटील (वय ५७) १९८३पासून शासकीय सेवेत आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध पदांवर काम केले आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविरोधात ज्ञात व कायदेशीर मार्गापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. या प्रकरणाची तीन वर्षांपासून चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये त्यांच्याकडे ११ कोटी ३४ लाख ६८ हजार ६० रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. त्यांच्याविरोधात आज सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाचे कोकण विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याविषयी पुढील तपास नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे अधिकारी करणार आहेत. (प्रतिनिधी)