सहकारी बँकांसाठी ‘नॉलेज हब’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:14 IST2018-08-19T00:13:44+5:302018-08-19T00:14:08+5:30
कॉसमॉसवरील सायबर दरोड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सहकारी बँकांसाठी ‘नॉलेज हब’!
पुणे : देशातील बँकिंग क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नागरी सहकारी बँक असोसिएशनने ‘नॉलेज हब’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डेबिट कार्ड क्लोनिंग, सायबर हल्ला, लेखापरीक्षणातील त्रुटी अशा विविध अडचणींची देवाणघेवाण आणि त्यावरील उपायांची माहिती या हबच्या माध्यमातून बँकांना उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
देशातील दुसºया क्रमांकाची शेड्युल्ड को-आॅपरेटिव्ह बँक म्हणून कॉसमॉस बँक मानली जाते. या बँकेवर ११ आणि १३ आॅगस्ट रोजी झालेल्या सायबर हल्ल्यात तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटून नेले होते. विदेशातील एटीएमबरोबरच पुणे, कोल्हापूर आणि देशातील विविध एटीएममधूनदेखील पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तावरे कॉलनीतील पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या मुख्यालयात शनिवारी बैठक बोलावण्यात आली होती. तीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञानप्रमुख उपस्थित होते. याशिवाय माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ निरंजन फडके आणि मोहन कामत यांनी बँक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, की कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नॉलेज हब उभारण्यात येणार असून, पुण्याच्या संघटनेपासून याची सुरुवात होईल. राज्य फेडरेशनदेखील असेच हब उभारेल. त्यामुळे सायबर अॅटॅक, डेबिट कार्ड क्लोनिंग यांच्यावरील अडचणींची देवाणघेवाण शक्य होईल.
एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून पैसे लुटून नेण्याच्या प्रकारात अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. या पार्र्श्वभूमीवर, विविध बँकांना आलेल्या अनुभवांची, त्यांनी त्यावर केलेल्या उपाययोजनांची देवाणघेवाण करण्यासाठी नॉलेज हब उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय, लेखापरीक्षण व इतर अडचणींबाबतही या नॉलेज हबची बँकांना मदत होणार आहे.
स्वत:चे डेटा सेंटर असणाऱ्या बँका, अर्धे डेटा सेंटर स्वत:चे आणि अर्धे डेटा सेंटरचे काम बाहेरच्या कंपनीकडून करून घेणारे अथवा संपूर्ण काम बाहरेच्या कंपनीला दिलेल्या बँका यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.
सहकारी बँका कॉसमॉसच्या मागे
कॉसमॉसवर झालेल्या सायबर हल्लाप्रकरणी सर्व नागरी सहकारी बँका कॉसमॉसच्या पाठीमागे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
अनेक सहकारी बँकांच्या ठेवी कॉसमॉस बँकेत आहेत. या बँकांनीदेखील तूर्तास ठेवींची आवश्यकता असली, तरी पैसे काढणार
नसल्याचे आश्वासन या बैठकीत दिले.