कपबशीने चुकविला घड्याळाचा ठोका
By Admin | Updated: May 17, 2014 21:52 IST2014-05-17T18:36:16+5:302014-05-17T21:52:39+5:30
राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून देणार्या खडकवासला मतदारसंघाने यंदा त्यांच्या विरोधात मतदान करुन घड्याळाचे काटे उलटे फिरविले आहेत.

कपबशीने चुकविला घड्याळाचा ठोका
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून देणार्या खडकवासला मतदारसंघाने यंदा त्यांच्या विरोधात मतदान करुन घड्याळाचे काटे उलटे फिरविले आहेत. कपबशीसारखे अनोळखी चिन्ह घेवून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना याच मतदार संघाने मोठे मताधिक्य दिले आहे. जानकरांनी या परिसरात कोणताही प्रचार न करता मिळविलेले मताधिक्य म्हणजे प्रस्थापितांवरील जनतेचा रोष असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
बारामती मतदार संघाला शहरातील धनकवडी, कात्रज, धायरी, वडगाव, सिंहगडरस्त्याचा परिसर जोडला गेला आहे. या शिवाय खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भोर-हवेली तालुक्याच्या काही भागाचा देखील यात समावेश आहे. खडकवासला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर करीत असले तरी, या परिसरात राष्ट्रवादीचे नगरसेवक, जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचे वर्चस्व आहे.
महायुतीचे जानकर या भागाला अपरिचित असेले उमेदवार होते. खडकवासला मतदारसंघात तर त्यांनी जवळपास काहीच प्रचार केलेला नव्हता. स्वत: प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेणे तर दूरच होते. तसेच त्यांनी शिवसेनेचे धनुष्य अथवा भाजपचे कमळ चिन्ह न घेता कपबशी चिन्ह घेणे पसंत केले होते. त्यातच प्रचार करण्याच्या उदासिनतेमुळे (?) त्यांना स्वत:लाच मतदारांपर्यंत पोचता आले नव्हते. त्यांचे चिन्ह पोचणे तर शक्यच नव्हते ! असे असूनही मतदारांनी जानकरांना दिलेले मताधिक्य हे प्रस्तापित उमेदवाराविरोधातील रोषच व्यक्त करतो. मतदानाच्या दिवशी देखील या भागातील राष्ट्रवादीचे नेते उदासिन होते. तर कार्यकर्ते कपबपशी चिन्हाचा प्रचार करताना दिसत होते. जानकरांनी जर महायुतीशी थेट जोडणारा कमळ अथवा धनुष्य या चिन्हाचा आधार घेतला असता तर सुळे आणखी पिछाडीवर गेल्या असत्या, असेच आता बोलले जात आहे.
------------
खडकवासल्याने पाजले पाणी
गेल्या २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत या भागाने सुळे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. त्या वेळी भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांना खडकवासल्यातून केवळ ३२ हजार ५६० मते मिळाली होती. तर सुळे यांनी तब्बल ६२ हजार ७९८ मते (३० हजार २३८ आघाडी) मिळविली होती. या निवडणुकीत मात्र खडकवासल्यातून सुळे यांना ७० हजार ६०२ तर जानकरांना तब्बल ९८ हजार ७२९ मते मिळाली आहेत. म्हणजेच सुळे यंदा २८ हजार १२७ मतांनी पिछाडीवर आहेत.