चाकू पाठीत की खांद्यात भोसकला?

By Admin | Updated: November 30, 2014 00:56 IST2014-11-30T00:56:21+5:302014-11-30T00:56:21+5:30

चाकू पाठीत की खांद्यात भोसकला होता, याबाबत एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या साक्षीत तफावत असल्याची कबुली तपास अधिकारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधव गिरी यांनी

Knife behind the shoulder? | चाकू पाठीत की खांद्यात भोसकला?

चाकू पाठीत की खांद्यात भोसकला?

प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या साक्षीत तफावत : तपास अधिकारी माधव गिरी यांची उलट तपासणीत कबुली
नागपूर : चाकू पाठीत की खांद्यात भोसकला होता, याबाबत एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या साक्षीत तफावत असल्याची कबुली तपास अधिकारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधव गिरी यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याच्या सुनावणी दरम्यान उलट तपासणीत दिली.
राजू सरोदे नावाच्या साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या बयानात असे म्हटले होते की, उंच आणि ठेंगण्या बांध्याच्या दोन मुलांनी चाकू मोनिकाच्या पाठीत भोसकलेला होता. चाकूची मूठ बाहेर दिसत होती. प्रत्यक्ष न्यायालयात साक्ष देताना या साक्षीदाराने चाकू खांद्यात भोसकलेला होता, असे म्हटले होते. साक्षीदाराच्या साक्षीत ही तफावत असल्याचे गिरी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मोरेश्वर धोटे नावाच्या साक्षीदाराने मृत मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे आपल्या साक्षीत सांगितले नव्हते. ११ मार्च २०११ रोजी घटनास्थळी उमेश अवथनकर हा होता आणि त्यानेच तक्रारही दाखल केली होती.
मोरेश्वर धोटे यांचे ११ मार्च ते १९ मे २०११ बयान घेतले नाही, कारण ते घटनास्थळी नव्हतेच. फिर्यादी अवथनकर यांनी त्यांना घटनेची सूचना दिली होती. म्हणूनच आपण याबाबत आरोपपत्रात नमूद केले नव्हते.
१६ मार्च २०११ रोजी आपण तपास हाती घेतला तेव्हा मृत मुलगी मोनिका कुठे राहत होती, कुठे शिकत होती, याबाबत आपणाला माहिती होती.
परंतु तिच्या आई-वडिलांबाबत माहिती नव्हती, असेही गिरी यांनी सांगितले. मोहम्मद मुदस्सर याने न्यायालयात दिलेल्या साक्षीत आपण उमेश अवथनकर याला ओळखतो. तो शिक्षक आहे. अभिनव ट्युशन क्लासेस चालवतो.
घटना दर्शन कॉलनी ते श्रीनगर दरम्यान रस्त्यावर पूर्व-पश्चिम दिशेला प्लॉट क्रमांक २० समोर घडली, असे सांगितले होते. मात्र ही माहिती त्याच्या पोलीस बयानात नाही, असेही गिरी यांनी उलटतपासणी साक्षीत कबूल केले. आज गिरी यांची उलटतपासणी साक्ष अर्धवट राहिली. ११ डिसेंबरपासून ती पुन्हा प्रारंभ होणार आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुदीप जयस्वाल आणि अ‍ॅड. नितीन हिवसे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)

Web Title: Knife behind the shoulder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.