इंधननिर्मितीत ‘किसन वीर’चे योगदान मोलाचे

By Admin | Updated: March 27, 2015 23:59 IST2015-03-27T22:52:24+5:302015-03-27T23:59:18+5:30

निकोलस विटगेनस्टेन : कारखान्यात सीएनजी गॅसनिर्मितीस प्रारंभ--साखर उद्योगात पहिला प्रयोग

Kisan Veer's contribution in fuel manufacture | इंधननिर्मितीत ‘किसन वीर’चे योगदान मोलाचे

इंधननिर्मितीत ‘किसन वीर’चे योगदान मोलाचे

भुर्इंज : भुर्इंजसारख्या ग्रामीण भागात विदेशी तंत्रज्ञान आणण्यात कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर व संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. सुमारे तीस कोटींची गुंतवणूक करून कारखान्यात स्पेंटवॉशपासून सीएनजी गॅसनिर्मिती प्रकल्प सुरू करून किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने पर्यावरणपूरक स्वच्छ इंधननिर्मितीच्या राष्ट्रीय कार्यात हातभार लावला आहे,’ असे मत ग्रीन एलिफंटा इंडियाचे डायरेक्टर डॉ. निकोलस विटगेनस्टेन यांनी व्यक्त केले.
किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर टाकाऊ स्पेंटवॉशपासून सीबीजी-सीएनजी गॅसनिर्मितीला प्रत्यक्षात सुरुवात झाली. या सीएनजी गॅस बॉटलिंगचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, डॉ. निकोलस व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.पहिल्या टप्प्यात प्रतिदिन पंचवीस हजार क्यूबिक मीटर बायोगॅसची निर्मिती झाली आहे. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर पीयूष भांबरे, एस. जे. मलिक, उत्तम जगताप, नवनाथ केंजळे, शेखर भोसले-पाटील, मधुकर शिंदे, किशोर सणस, विशाल भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)

साखर उद्योगात पहिला प्रयोग
उसापासून साखर तयार होताना उपपदार्थ अल्कोहोल उत्पादनही सर्वत्र मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. परंतु यातून निर्गमित होणाऱ्या स्पेंटवॉशच्या विल्हेवाटीचा प्रश्न सर्वांसमोर उभा होता. परंतु जर्मनीत ग्रीन एलिफंटा कंपनीने या स्पेंटवॉशपासून सीएनजी गॅसनिर्मितीची सुरुवात केली. या नवीन तांत्रिक बदलाची नोंद ‘किसन वीर’च्या व्यवस्थापनाने सर्वात प्रथम घेतली. ग्रीन एलिफंटाशी संपर्क साधून ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर ‘किसन वीर’ ने त्यांना हा प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन देऊन सर्व पायाभूत सुविधा पुरविल्या. सहकार तत्त्वावरील साखर उद्योगात असा प्रयोग प्रथमच घडला आहे.

Web Title: Kisan Veer's contribution in fuel manufacture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.