किसान सभेचा लाँग मार्च स्थगित; गिरीश महाजनांची यशस्वी शिष्टाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:10 IST2019-02-21T23:10:40+5:302019-02-21T23:10:50+5:30
सरकारच्या लेखी आश्वासनानंतर लाँग मार्च स्थगित

किसान सभेचा लाँग मार्च स्थगित; गिरीश महाजनांची यशस्वी शिष्टाई
नाशिक: नाशिकमधून निघालेला किसान सभेचा लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलकांशी चर्चा केली. तब्बल पाच तास ही चर्चा सुरू होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महाजन यांनी दिली. यानंतर लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार जे. पी. गावित यांनी यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली.
आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिकहून लाँग मार्चला सुरुवात केली. हा मोर्चा 27 तारखेला मुंबईत धडकणार होता. मात्र गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीनं आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्या मान्य असल्याचं लेखी आश्वासन त्यांनी दिलं. वन हक्क जमिनीचे दावे लवकरात लवकर निकाली काढा, अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती. त्यांना सरकारकडून 3 महिन्यात दावे निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं. यानंतर किसान सभेनं मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा यशस्वी झाली. सातबारा कोरा, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदिवासी लाँग मार्च करत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकूच करत निघाले होते.