कीर्तिकर यांच्याकडे ६६ प्रभागांची जबाबदारी
By Admin | Updated: October 17, 2016 01:52 IST2016-10-17T01:52:57+5:302016-10-17T01:52:57+5:30
आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने जय्यत सुरू केली आहे.

कीर्तिकर यांच्याकडे ६६ प्रभागांची जबाबदारी
मनोहर कुंभेजकर,
मुंबई- आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने जय्यत सुरू केली आहे. शिवसेना शाखाशाखांना भेटी देण्याची घोषणा कालच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपासोबत युती झाली किंवा झाली नाही, तरी शिवसेना पालिका निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेकडे मुंबईच्या प्रत्येक प्रभागात तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. महिलांची मोठी संख्या ही पक्षाची जमेची बाजू मानली जाते. शिवसेनेतील दिग्गजांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडे तब्बल ६६ प्रभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसैनिक आणि परिचितांमध्ये ‘भाऊ’ किंवा ‘गजाभाऊ’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी पालिका निवडणुकीची अंधेरी ते थेट कांदिवलीपर्यंतच्या ६२ पूर्ण आणि ४ अर्ध प्रभाग अशा ६६ प्रभागांची जबाबदारी सोपवली आहे. क्रमांक २मधील २१ पालिका प्रभाग ३मधील २३ पालिका प्रभाग आणि ४मधील १९ पालिका असून, कांदिवली ते अंधेरी(पूर्व-पश्चिम) असे थेट येथील ९ विधानसभा मतदारसंघांतील ६६ पालिका प्रभागांमधून जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्याची मोठी जाबबदारी त्यांच्यावर सोपविल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
नव्या आरक्षण रचनेनुसार उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात ७५, ७६, ८०, ८१, ८४, ८६ असे ६ पूर्ण प्रभाग आणि ७२, ८३, १२१ असे तीन अर्ध प्रभाग असे एकूण ९ प्रभाग येतात. अंधेरी (प.) विधानसभा मतदारसंघातील ६४ ते ७१ असे एकूण ७ प्रभाग, वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील ५७, ६०, ६१, ६२, ६३, ६८ असे ६ प्रभाग असे जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील ५२, ५३, ७२, ७३, ७४, ७७, ७३ असे ८ प्रभाग, गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ५०, ५१, ५४, ५५, ५६, ५७, ५८ असे एकूण ७ प्रभाग, दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४ हे ७ पूर्ण प्रभाग आणि प्रभाग क्र. ३७चा अर्धा भाग असे एकूण ८ प्रभाग येतात. असे ४५ प्रभाग आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मालाड (प.), कांदिवली (पूर्व) आणि चारकोप विधानसभा मतदारसंघ असे येथील २१ प्रभाग अशा या ९ विधानसभा मतदारसंघांतील सुमारे ६६ प्रभागांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली. कीर्तिकर यांनी आत्तापर्यंत जुन्या आरक्षणाप्रमाणे ५४पैकी ४५ शिवसेना शाखांना भेटी दिल्या आहेत.