किपलिंगचा ‘जेजे’शी काय संबंध ?
By Admin | Updated: September 24, 2015 01:47 IST2015-09-24T01:47:04+5:302015-09-24T01:47:04+5:30
जालियनवाला बाग हत्याकांडात मायकेल ओडवायरला पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या व साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या रुडियार्ड किपलिंग यांचा जन्म जे. जे. स्कूल आॅफ आर्टमधल्या डीन बंगल्यात झाला

किपलिंगचा ‘जेजे’शी काय संबंध ?
अतुल कुलकर्णी, मुंबई
जालियनवाला बाग हत्याकांडात मायकेल ओडवायरला पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या व साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या रुडियार्ड किपलिंग यांचा जन्म जे. जे. स्कूल आॅफ आर्टमधल्या डीन बंगल्यात झाला एवढ्या एकाच निकषावर पुरातत्त्व विभागाने या बंगल्याला प्राचीन व ऐतिहासिक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाचे कलावंतांमध्ये मात्र संतप्त पडसाद उमटले आहेत.
पुरातत्त्व विभागाच्या या निर्णयामुळे ब्रिटिश स्थापत्य कलेचा नमुना असणारे १८०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम आणि सभोवतालचा ४ हजार चौरस मीटरचा परिसर संरक्षित स्मारक बनले आहे. याच ठिकाणी आर. के. लक्ष्मण यांचेही स्मारक केले जाईल, असेही पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. ही तर सरळसरळ दडपशाही आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कलावंतांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस म्हणाले, आर.कें़च्या योगदानाबद्दल प्रश्नच नाही. मात्र अनेक धुरंधर चित्रकारांच्या चित्रांची आबाळ होत असताना असे निर्णय घेणे योग्य नाही. आर. के. राजकीय व्यंगचित्रकार होते. त्यांचे काम वर्तमानपत्रातून प्रकाशित होत असे. त्यामुळे पत्रकारितेशी संबंधित अनेक संस्थांमध्ये सरकारने त्यांचे स्मारक जरूर करावे; पण जेजेमध्ये अशा गोष्टी करणे औचित्याला धरून नाही. माझ्या मताशी ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे हेदेखील सहमत असल्याचे फडणीस म्हणाले.
कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे राज चित्रकार आबालाल रहेमान, अजिंठ्याच्या प्रतिकृतीचे काम करणारे पेस्तनजी बोमनजी, दिल्लीच्या साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये ज्यांची पेंटिंग्ज लागली ते रावबहाद्दूर धुरंधर असोत किंवा जागतिक कीर्तीचे शिल्पकार गणपतराव म्हात्रे, पोर्तुगाल सरकारने स्वत:च्या खर्चाने ज्या ए. एक्स. त्रिंदाद यांचे म्युझियम उभे केले़ अशा सगळ्या जागतिक दर्जाच्या कलावंतांमध्ये समान धागा होता तो मुंबईच्या जे. जे. स्कूल आॅफ आर्टचा. या ठिकाणी शिकलेल्या आणि नोकरी केलेल्या या सगळ्यांच्या अनेक कलाकृती आजही जेजेमध्ये धूळखात पडून आहेत. असे असताना किपलिंग यांचे स्मारक उभारणे योग्य नसल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात बॉम्बे आर्ट सोसायटी आॅफ इंडिया, संस्कार भारती आणि आर्ट सोसायटी आॅफ इंडिया यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्रे पाठवली आहेत.
किपलिंगचे स्मारक ‘जेजे’त म्हणजे देशद्रोह नाही का?
जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणाऱ्या रुडियार्ड किपलिंग यांचे स्मारक जे़जे़सारख्या वास्तूत करणे म्हणजे देशद्रोह होत नाही का? जगातल्या कोणत्याही देशात नाही असा १५८ वर्षांचा संपन्न कलाकृतींचा खजिना जेजेमध्ये बंदिस्त आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ डीन बंगल्यात जन्म झाला म्हणून स्मारक केले जात असेल तर यासारखे दुर्दैव दुसरे असूच शकत नाही.
- वासुदेव कामत, अध्यक्ष, आर्ट सोसायटी
आंदोलन करू... ऐतिहासिक चित्रांचा कायमस्वरूपी संग्रह न करता फडतूस कल्पना मांडून कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा अवमान करणे योग्य नाही. आधीच्या शासनाने असेच केले व आताच्या शासनाचेही तेच सुरू आहे. हे थांबवले नाही तर आंदोलन करू. - सुहास बहुलकर, ज्येष्ठ चित्रकार